‘अरुणोदय’मुळे कलाकारांना पुणे, मुंबईत जाण्याची गरज नाही : वाघ अहमदनगर | नगर सह्याद्री नगरमध्ये अरुणोदय प्रोडशन हाउस सुरु झाल्याने आता नगरम...
‘अरुणोदय’मुळे कलाकारांना पुणे, मुंबईत जाण्याची गरज नाही : वाघ
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगरमध्ये अरुणोदय प्रोडशन हाउस सुरु झाल्याने आता नगरमध्येही तोलामोलाची चित्रपट चळवळ निर्माण होणार आहे.नवगतांसाठी सर्व अत्याधुनिक व महागडी यंत्रसामग्री सर्वांसाठी उपलब्ध करून देणारे सचिन जगताप हे कल्याणकारी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मुळे कलाकारांना नगरमधूनच मोठ्या संधी मिळणार असल्याने त्यांना पुणे, मुंबईत स्ट्रगल करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी केले.
नगरमध्ये माजी आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणोदय फिल्म फेस्टिवल २०२३ चे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात करण्यात आले. फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेत्री अर्शिन मेहता यांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, फिल्म फेस्टिव्हलचे संयोजक सचिन जगताप, प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले, स्मिता गोंदकर, अमृता अग्रवाल, लेखक दिग्दर्शक तेजपाल वाघ, पार्वती जगताप, ए.जे. प्रोडशनच्या संचालिका व जि.प.सदस्या सुवर्णा जगताप, नगरसेविका शितल जगताप, चित्रपट निर्माते दादासाहेब जगताप, सचिन कोतकर, डॉ.शशीकांत फाटके, डॉ.वंदना फाटके आदींसह नगरसेवक, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी अरुणोदय या चित्रपट निर्मिती संस्थेचे उद्घाटन अरुण जगताप यांच्या हस्ते झाले.
या महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कुंकुमार्चन लघुपटाचे दिग्दर्शक व निर्मात्यांचा विशेष सन्मान करण्यत आला. आ.संग्राम जगताप म्हणाले, माजी आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करून अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नगरच्या मातीने अनेक दिग्गज कलाकर नाट्य व चित्रपट सृष्टीला दिले व देत आहे. आता नगरमधूनच कलाकार, निर्माते, दिग्दर्शक निर्माण व्हावेत यासाठी सचिन जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सर्वप्रकारचे अद्यावत कॅमेरा, लाईट व यंत्रसामग्री त्यांनी अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली आहे.दिग्दर्शक मंगेश बदर म्हणाले, नगर जिल्हा जसा राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे तसे देशातील सर्वात मोठ्या मनाचे नागरिक नगरमध्ये राहतात. नगरमध्ये चित्रपट सृष्टी क्षेत्रासाठी खूप क्षमता आहे. माझ्या मदार चित्रपटाला जे फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळाले त्यात नगरचा मोठा वाटा आहे.अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणल्या, एखादे सुगंधी फुल जसे कधीच लपू शकत नाही तशी कलाकाराची कलाही कधीच लपू शकत नाही. नगरमध्ये असलेल्या कलेला चालना देण्यासाठी येथे आता प्रोडशन हाउस सुरु झाल्याने येथील कलाकारांच्या कलेचा सुगंध पूर्ण देशात पसरेल.
उद्घाटक अर्शिन मेहता म्हणाल्या, चांगला चित्रपट निर्माण करून तो लोकांपर्यंत पोचविणे हे सर्वात अवघड काम आहे. हे काम आता नगर मधून होणार आहे. मी नगरचीच असल्याने नगरमध्ये प्रोडशन हाउस सुरु झाल्याचा खुप आनंद होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेस्टिव्हल डायरेटर शशीकांत नजन यांनी केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा जगताप यांनी आभार मानले. या महोत्सवात देश विदेशातून २५५ फिल्मचा सहभाग असून यामध्ये १६५ शॉर्ट फिल्म, ३२ म्युझिक व्हिडिओ, २३ डॉयुमेंटरी फिल्म, २० वेब सिरीज आणि १५ निमेशन फिल्मचा समावेश आहे. चित्रपट महोत्सवाची सुरुवात सचिन सुर्यवंशी यांच्या गाजलेल्या ’वारसा’ या विविध पारितोषिक विजेत्या ऐतिहासिक माहितीपटाने झाली. फेस्टिव्हलच्या यशस्वीतेसाठी फेस्टिवल कोऑर्डिनेटर समीर दाणी, महोत्सव सदस्य सुहास तरंगे, संदीप बोदगे, भूषण गणुरकर, अक्षय देशपांडे, नितीन ढाकणे, आकाश बनकर, कृष्णा बेलगावकर, पी.के.भांडवलकर, अभिजित जगदाळे, यशोदिप म्हसे, आकाश गोटीपामुल आदी नियोजन करत आहेत.
COMMENTS