जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू अहमदनगर | नगर सह्याद्री- २००४ पासून बंद झालेली जुनी पेशन्श योजना लागू करावी, यासह विविध म...
जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू
अहमदनगर | नगर सह्याद्री-
२००४ पासून बंद झालेली जुनी पेशन्श योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांनी संप पुकारल्याने विविध शासकीय कार्यालयातील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. विशेष म्हणजे एरवी आर्थिक मागण्यांवरून सतत बंदचा नारा देणारी महापालिका कर्मचारी युनियन या संपापासून दूर दिसत आहे. सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट असताना महापालिकेत मात्र पूर्ण क्षमतेने कर्मचारी उपस्थित असून, कामकाज सुरू आहे नवीन पेन्शन योजना रद्द करणे, प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन, सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या कराव्यात, सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करावेत, निवृत्तीचे वय ६० करावे, नवीन शिक्षण धोरण रद्द करावे, आरोग्य कर्मचार्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करावे आदी मागण्यांसाठी हा संप आहे.
संपात सहभागी होणार्या शासकीय-निमशासकीय कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. नगरमध्ये संपातील सहभागी कर्मचार्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर विविध कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
दरम्यान, राज्यभर या संपाची झळ बसली असून, ठिकठिकाणी शासकीय कार्यालयातील कामकाज पूर्णतः ठप्प आहे. यापूर्वी १९७७ मध्ये असा संप झाला होता. शिंदे-फडणवीस सरकारसमोरील हा सर्वात मोठा कसोटीचा क्षण आहे. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या अभ्यासासाठी समिती गठीत करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. णार आहे. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचार्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावे, हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगत संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
विधीमंडळातील मुख्यमंत्री समिती कक्षात राज्य संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. संपाला महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या इंटक, हिंद मजदूर सभा, आयटक, सीटू, एआयसीसीटीयू, एनटीयुआय, बीकेएसएम, बँक, विमा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षक संघटना यांनी सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे.संप लक्षात घेऊन विभागप्रमुखांनी व कार्यालयीन प्रमुखांनी संप मिटेपर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचार्याची रजा मंजूर करू नये. जे कर्मचारी रजेवर त्यांची रजा रद्द करून त्वरीत कामावर बोलवण्याचे आदेश जारी केले आहेत.
COMMENTS