अहमदनगर | नगर सह्याद्री मनपा प्रशासनाने स्थायी समितीस सादर केलेल्या १२४० कोटींच्या अंदाजपत्रकात वाढ करण्याची शिफारस करीत स्थायी समितीने १३८...
अहमदनगर | नगर सह्याद्री
मनपा प्रशासनाने स्थायी समितीस सादर केलेल्या १२४० कोटींच्या अंदाजपत्रकात वाढ करण्याची शिफारस करीत स्थायी समितीने १३८७ कोटी ७९ लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. स्थायी समितीने १४७ कोटी ७९ लाख रूपयांची वाढीव शिफारस केली आहे.
सभापती गणेश कवडे यांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे हे अंदाजपत्रक सादर केले. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता, मनपाचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे, असे सभापती कवडे यांनी सांगितले. महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकीय सभा झाली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, श्रीनिवास कुर्हे, मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे, नगरसचिव एस. बी. तडवी आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते.
अंदाजपत्रक महासभेला सादर केल्यानंतर सभापती कवडे यांनी मनोगतात म्हटले, की ज्या मालमत्ताधारकांची नोंदणी झाली नाही, त्यांना घरपट्टीची आकारणी करावी. शहर व उपनगरात पत्र्यांचे गाळे बांधले आहेत. या सर्वांना घरपट्टी आकारणी करावी. रिव्हिजन करून घरपट्टी आकारणीचे काम करावे. आवश्यक त्या ठिकाणी पे ऍण्ड पार्कची व्यवस्था करावी. अनधिकृत बांधकांचा शोध घ्यावा.
भाडेतत्वावर दिलेल्या शाळाखोल्यांची थकबाकी वसूल करावी. नेहरू मार्केटच्या ठिकाणी अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेस व भाजी मार्केट उभारणे, प्रोफेसर चौकात शॉपिंग मॉल उभारणे, सावेडी गावठाण येथील शॉपिंग सेंटर, गंजबाजार भाजी मार्केट व अद्ययावत सुवर्णपेढी उभारणे, टीडीआरच्या माध्यमातून मोकळ्या जागा विकसित करणे, या कामांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून एफबीटी किंवा बीओटी तत्वावर बांधकाम केल्यास उत्पन्न वाढून बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
राष्ट्रपुरूषांचे पुर्णाकृती पुतळे उभारण्यासाठी शासनाची परवानगी घेऊन वर्षभरात पुतळे उभारण्याचा प्रयत्न आहे. पर्यावरण संतुलनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वृक्ष लागवड करण्यात येईल. यासाठी पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. शहरातील मुख्य चौकांचे सुशोभिकरण लवकरच हाती घेण्यात येईल. भुयारी गटार योजनेच्या दुसर्या टप्प्याच्या कामास मंजुरीसाठी काम सुरू आहे. केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, मुकुंदनगर, सावेडी गावठाण व उपनगर तसेच नवीन विस्तारीत उपनगरे यांचा समावेश यात करण्यात येणार आहे.
COMMENTS