अहमदनगर | नगर सह्याद्री- जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीचे बहुमत असतानाही झालेला पराभव अतिशय लाजिरवाणा आहे. हा पराभव कोणामुळे झाल...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीचे बहुमत असतानाही झालेला पराभव अतिशय लाजिरवाणा आहे. हा पराभव कोणामुळे झाला हे छोट्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठांपर्यंत सर्वांना माहिती आहे. ज्यांनी आपल्या उमेदवाराला मतदान केले नाही, त्यांना त्यांच्या तालुयांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून जाब विचारावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची बुधवारीनिवड झाली. बँकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस संचालकांचे बहुमत असतानाही भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला. घुले यांना अध्यक्ष करण्यासाठी ज्येष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे हा पराभव म्हणजे या दोघांसाठी मोठा धक्का मानला जातो.
या निवडीसाठी स्वतः काकडे यांनी नगरमध्ये तळ ठोकले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आपला विजय झाल्याचे कर्डिले यांनी निवडीनंतर सांगितले होते. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. आता काकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फुटीर संचालकांविरोधात आक्रमक होण्याचे सांगितले आहे.
आपल्या आवाहनात काकडे यांनी म्हातारी मेल्याचे दुःख नाही, परंतु काळ सोकावता काम नये, असे म्हणत म्हटले की, नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणूक निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता, आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामध्ये कालचा पराभव हा राज्यावर फार परिणाम करणारा नसला, तरी नगर जिल्ह्यावर मात्र त्याचा निश्चित परिणाम होईल, हे ज्यांनी कोणी मतदान केले नाही, त्यांनी समजून घेतले नाही. त्याची फळे त्यांना आगामी काळामध्ये भोगावी लागतील. ज्येष्ठ नेते अजित दादा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीत सर्व संचालकांची मते आजमावून घेत निर्णय घेतला.
हा निर्णय घेत असताना ज्यांनी कोणी मतदान केले नाही त्यांनी आपली नाराजी किंवा आपले स्पष्ट मत कोणाजवळही व्यक्त केले नाही. तसेच उमेदवारी बाबत निर्णय अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून घेतला होता. त्यांच्यासमोर बोलण्याचे धाडस कोणी केले नसेल, हे मी समजू शकतो. पण काल सकाळी मी स्वतः आलो होतो, त्यावेळी जरी मला नाराजी त्यांनी सांगितली असती तरी मी अजित पवार यांच्याशी बोलून काही मार्ग काढला असता. परंतु आपले स्पष्ट मत सांगण्याचे धाडस न दाखवता, छुप्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली हे पक्षाप्रती अतिशय चुकीचे आहे. शिवाय ही निवडणूक ३ वर्षासाठी नव्हती, एक वर्षानंतर आपण पुन्हा बदल करू शकत होतो. जे कोणी इच्छुक होते त्यांना पुढची दोन वर्षे संधी मिळू शकली असती.
परंतु त्यांनी ती गमावली आणि आता तीन वर्ष तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार आहे. आपली वरिष्ठ मंडळी याबाबत जो काय निर्णय घ्यायचा तो निश्चित घेतील. नजिकच्या काळात तो निर्णय पाहायला देखील मिळेल. पण माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, की ही पाच मते कोणाची गेली, हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यांना तालुयात जाहीरपणे त्याचा जाब विचारा. तुम्ही हे कृत्य का केले याचे उत्तर आम्हाला हवे. अनेक वर्षे सत्ता भोगून देखील ही मंडळी असे वागतात. आपणही असे वागल्याशिवाय ते जागेवर येणार नाहीत. मला जो अहवाल वरिष्ठांकडे द्यायचा आहे, तो मी सविस्तर देईन आणि भविष्य काळात यांचा पक्षाने करेट कार्यक्रम करावा अशी विनंती करेल, असेही काकडे यांनी म्हटले आहे.
COMMENTS