भंडारा। नगर सह्याद्री - दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू आहे. पेपर सुरू असतानाच वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्याच दिवशी भूमितीचा पेपर होता. ...
भंडारा। नगर सह्याद्री -
दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू आहे. पेपर सुरू असतानाच वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्याच दिवशी भूमितीचा पेपर होता. एकीकडे वडिलांच्या जाण्याचे अपार दुःख अन् दुसरीकडे बोर्डाची परीक्षा! तरी मनावर दुःखाचा डोंगर ठेवून डोळ्यात आसू साठवून त्याने धैर्याने पेपर सोडविला. यानंतर त्याने वडीलांच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला.
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे १५ मार्चला ही घटना घडली आहे. येथील भाष्कर पांडुरंग तुपटे (वय ४२) यांची मागील चार-पाच दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी डॉक्टरांच्या मदतीने उपचारही केले. मात्र बुधवारी अचानकपणे सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा 16 वर्षीय मुलगा ओमकार शिवाजी विद्यालयात शिकतो. त्याचा सकाळी ११ वाजता दहावीच्या भूमितीचा (गणित -२) पेपर होता. एकीकडे पितृवियोग अन् दुसरीकडे परीक्षा! अखेर दुःख बाजुला सारून त्याने परीक्षा (SSC Exam) देण्याचा निर्णय घेतला आहे.
डोळ्यात आसवांचा पूर घेऊन खिन्नपणे बसलेल्या मुलाला कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी हिंमत दिली. घडले ते आपल्या हातात नाही. परीक्षा दे, ही संधी सोडू नको, असे समजावले आहे. गावापासून १२ किलोमीटर अंतरावरील लाखांदूरच्या शिवाजी विद्यालयातील परीक्षा केंद्र गाठले आहे. डोळ्यातील आसवांना बांध घालून पेपर सोडविला. घरी परतल्यावर कुटुंबीय, नातलग व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत वडिलांच्या चितेला भडाग्नी देऊन मुलाचे कर्तव्य पार पाडले आहे.
COMMENTS