जिथे आंतरराष्ट्रीय कायदा परवानगी देईल तिथे अमेरिकन विमाने उड्डाण करतील. अमेरिकेने रशियाला आपली विमाने सावधगिरीने चालवण्याचा इशाराही दिला आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
अमेरिकेच्या लष्करी टोही ड्रोनला रशियाच्या लढाऊ विमानाने धडक दिल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या मुद्द्यावर रशियाचे संरक्षण मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांच्यात फोनवर चर्चाही झाली. संभाषणात रशियाने अमेरिकेवर हेरगिरीचा आरोप केला. चर्चेनंतर अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी असे म्हटले आहे की, जिथे आंतरराष्ट्रीय कायदा परवानगी देईल तिथे अमेरिकन विमाने उड्डाण करतील. अमेरिकेने रशियाला आपली विमाने सावधगिरीने चालवण्याचा इशाराही दिला आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी एक निवेदन जारी केले की, जिथे आंतरराष्ट्रीय कायदा उड्डाणाला परवानगी देईल तिथे अमेरिका आपली विमाने उडवत राहील. आपली विमाने सुरक्षितपणे आणि योग्यरित्या चालवणे हे रशियावर अवलंबून आहे. ड्रोन पाडण्याच्या घटनेला अमेरिकेने रशियाचा निष्काळजीपणा आणि चुकीची वृत्ती असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे लष्कर प्रमुख मार्क मायली यांनी सांगितले की, 'पेंटागॉन या घटनेच्या व्हिडिओचे विश्लेषण करत आहे आणि या घटनेत काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला माहित आहे की आमचे ड्रोन जाणूनबुजून अडवले असून हे आक्रमक पद्धतीने केले गेले आणि ते अत्यंत चुकीचे आणि असुरक्षित आहे.
त्याचवेळी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई सोइगु यांनीही अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेवर हल्लाबोल केला. अमेरिकेकडून रशियाची हेरगिरी केली जात असून आता अशा घटना वाढल्या आहेत. याच कारणामुळे लढाऊ विमानाला ड्रोनने धडक दिल्याची घटना घडली. क्राइमियाच्या किनार्यावरून उडणारे अमेरिकेचे धोरणात्मक ड्रोन हे चिथावणी देणारे कृत्य असल्याचेही रशियाने म्हटले आहे. त्यामुळे काळ्या समुद्राच्या प्रदेशात दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. चिथावणी देणारे कृत्य असेच सुरू राहिल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असेही रशियाने म्हटले आहे.
नुकतेच, काळ्या समुद्रात क्राइमियाच्या किनार्याजवळ रशियन लढाऊ विमानाच्या धडकेमुळे अमेरिकेच्या लष्करी टोही ड्रोनचे नुकसान झाले आणि ते समुद्रात पडले. रशियाने जाणूनबुजून आपले ड्रोन पाडल्याचा आरोप अमेरिकेने केला असून नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी रशियाने याला अपघात म्हटले असले तरी अमेरिका चिथावणी देत असल्याचा आरोपही केला आहे.
COMMENTS