सुनिल चोभे | नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी बाजी मारली. त्यामुळे नगर त...
सुनिल चोभे | नगर सह्याद्री -
जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी बाजी मारली. त्यामुळे नगर तालुक्यासह जिल्हाभरातील भाजप कार्यकर्त्यांना ताकद मिळाली आहे. आगामी होऊ घातलेल्या बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आल्याने आगामी निवडणुका रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांच्या ताकदीपुढे नगरमधील महाविकास आघाडी कशी झुंज देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणार्या साकळाई उपसा जलसिंचन योजना सर्वेक्षणास मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी कर्डिले यांचा भव्य नागरी सत्कार नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहणार असून जिल्ह्यातील आमदार, भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जिकडे सत्ता तिकडे कार्यकर्त्यांची गर्दी, त्यामुळे सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या जास्त आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. फडणवीस यांनी नुकताच कर्जत दौरा केला होता. या दौर्यात अनेकांनी भाजपचा पंचा गळ्यात घातला.
‘साकळाई’ योजना पथ्यावर!
गेल्या २५-३० वर्षापासून साकळाई पाणी योजनेचे भीजत घोंगडे होते. साकळाई कृती समितीने आवाज उठविल्याने खा. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यांनी लक्ष घातले. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांनी साकळाई पाणी योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली. या मान्यतेमुळे साकळाई योजनेतील लाभधारक शेतकरी खूश झाला असून आता साकळाई योजना होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. दरम्यान, यापूर्वी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी वाळकीत घेण्यात आलेल्या जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता. आता फडणवीस यांनी साकळाईच्या सर्वेक्षणास मान्यता दिली आहे. त्यामुळे २५ वर्ष भीजत पडलेली साकळाई योजना भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जावू लागले आहे.
कर्डिले यांची ताकद वाढली
नगर तालुक्यात जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले आणि नगर तालुुका महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे. निवडणूक कोणतीही असो, असाच संघर्ष पहावयास मिळतो. जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी शिवाजी कर्डिले यांची निवड झाल्याने एकंदरीतच त्यांची तालुक्यातील ताकद आणखी वाढली आहे. आगामी निवडणुका बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती, विधान परिषद व विधानसभेसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून साखरपेरणी केली जाणार आहे. नगर तालुका पंचायत समितीवर डोळा ठेवून जिल्हा परिषदेच्या गटांवर कर्डिले यांच्यासह समर्थकांनी लक्ष केद्रींत केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीस यांच्या रूईछत्तीसीतील कार्यक्रमात अनेकांचा भाजप प्रवेश
सध्या राज्यात, देशात भाजपाचे सरकार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न भाजपचे नेते बाळगून आहेत. तसेच अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी सुप्त हालचाली चालविल्या आहेत. एप्रिलमध्ये सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होईल. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुईछत्तीशीतील कार्यक्रमात जिल्हाभरातून अनेकांचा प्रक्षप्रवेश होवू शकतो. कर्जत, पारनेर पाठोपाठ उपमुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा नगर दौर्यावर येत आहेत.
COMMENTS