देवेंद्र फडणवीस अन् राधाकृष्ण विखे पाटलांची दमदार खेळी / जिल्हा परिषदेच्या जोडीने लोकसभेसाठी होणार फायदा सारीपाट / शिवाजी शिर्के - नगर जिल्...
देवेंद्र फडणवीस अन् राधाकृष्ण विखे पाटलांची दमदार खेळी / जिल्हा परिषदेच्या जोडीने लोकसभेसाठी होणार फायदा
सारीपाट / शिवाजी शिर्के -
नगर जिल्ह्याच्या राजकारणावर कायम पकड ठेवून असणार्या शरद पवार यांना त्यांच्याच शिलेदारांनी काल कात्रजचा घाट दाखवला. नगरचे राजकारण करताना आम्ंहाला गृहित धरू नका, असाच काहीसा संदेश यानिमित्ताने राष्ट्रवादीतील बंडोबांनी दिला आहे. लोकसभेसाठी नगरच्या जागेची मशागत हाती घेऊन तयारीला लागलेल्या पवार काका-पुतण्याला ही मोठी चपराकच आहे. शिवाजी कर्डिलेंच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी नगरमध्ये थेट पवारांचीच विकेट घेतली. नगरमध्ये पहिल्यांदाच पवारांचा शब्द डावलला गेला आणि त्यात फडणवीस- विखे पाटील राज्यात हिरो झाले. एकूणच जिल्हा बँकेतील हा पराभव पवारांनी मोठ्या गांभिर्याने घेतला असणार हे नक्की! शरद पवार हे नगरच्या दौर्यावर येण्याच्या आदल्या दिवशी विखे पाटलांनी त्यांना जिल्हा बँकेत ‘कमळ’ फुलून दाखविले! राधाकृष्ण विखे पाटलांनी सत्तांतराचे दिलेले हे गिफ्ट पवारांच्या नक्कीच जिव्हारी लागलं असणार!
जिल्हा बँकेत चौदा संचालक असतानाही आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले पराभूत झाले. खरं तर हा पराभव घुलेंचा नक्कीच नाही! पराभव झाला तो शरद पवार-अजित पवार यांचा आणि बाळासाहेब थोरात यांचाही! जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे चौदा संचालक! भाजपाकडे सहा संचालक असतानाही त्यांच्याकडून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा अर्ज दाखल झाला. कर्डिले यांचा अर्ज दाखल झाला त्याचवेळी काहीतरी गडबड आहे, हे समोर आले होते. पवारांचे दूत म्हणून या निवडणुकीसाठी अंकुश काकडे नगरमध्ये बसून होते. आतमध्ये जे काही चालू आहे त्याची ते माहिती घेत होते. चंद्रशेखर घुले पाटलांचा अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांचा विजय सहज होईल असे वाटत होते. कारण संख्याबळ तसे होते. पण हे संख्याबळ कागदावरच राहिले. प्रत्यक्ष मतदानाची वेळ आल्यानंतर मोठी गडबड झाली. सहा मते असणार्या भाजपाने आणखी चार मते मिळवली आणि बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले विजयी झाले.
पुण्याच्या जोडीने शेजारच्या नगर जिल्ह्याच्या राजकारणावर आणि सहकारी क्षेत्रावर पवारांची पहिल्या पासून मोठी पकड! पवारांचा शब्द नगरकरांनी कायमच प्रमाण मानला आणि ते देतील तो आदेश शिरसावंद्य मानत त्याची अंमलबजावणी देखील झाली. जिल्हा बँकेत कायमच विखेंच्या विरोधात सर्वांची मोट बांधण्यात पवार यशस्वी झाले. तरीही विखे पाटलांनी या सर्वांवर मात केल्याचे इतिहास सांगतो. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात पवार-थोरातांनी एकत्र येत मोट बांधली आणि बँकेवर सत्ता मिळवली. राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले तर काँग्रेसला म्हणजेच बाळासाहेब थोरात गटाकडे उपाध्यक्षपद गेले. अॅड. उदय शेळके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आणि याच निवडणुकीत पवार-थोरात गटाला चारीमुंड्या चितपट करणारी कुस्ती फडणवीस-विखे पाटलांनी जिंकली. चार मते फुटली! फुटलेली मते कोणाची आणि फुटीर संचालक कोण याचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्याबाबत काय तो निर्णय होईलही! पण, नेत्याचा आदेश डावलून चारजण भाजपच्या गळाला लागले आणि त्यांनी पवारांच्या नाकावर टिच्चून कर्डिलेंना अध्यक्ष केले.
राज्यात सत्तेत असणार्या फडणवीसांनी विखे पाटलांच्या माध्यमातून नगरमधून बारामतीला शह दिला आहे. राज्यात अग्रेसर असणार्या जिल्हा बँकेत भाजपचा अध्यक्ष या दोघांनी करुन दाखवला. लवकरच होणार्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका आणि त्यापाठोपाठ होणारी लोकसभेच्या निवडणुकीवर जिल्हा बँकेतील या सत्तांतराचा नक्कीच परिणाम होणार आहे. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी विखे पाटलांनी मोठ्या हालचाली चालू केल्या असताना त्यांना जिल्हा बँकेत मिळालेले हे यश आणखी ताकद देणारे ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे केले आहे. लंके यांच्या माध्यमातून सुजय विखे यांना रोखण्यासाठीच्या हालचाली चालू झाल्या असतानाच जिल्हा बँकेत विखे पाटलांनी थेट पवारांनाच क्लिन बोल्ड करून टाकले. लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेली राष्ट्रवादी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने बॅक फुटवर गेली हे वास्तव सत्य आहे. फुटणारे संचालकांपैकी दोघेजण नगर लोकसभा मतदारसंघातील असल्याची चर्चा थांबायला तयार नाही. याचाच अर्थ लोकसभेच्या तयारीला लागलेली राष्ट्रवादी दोन तालुक्यात पिछाडीवर राहणार हे उघड सत्य आहे.
निवडणूक जिल्हा बँक अध्यक्षाची झाली असली तरी त्याचे परिणाम जिल्हा परिषदेच्या जोडीने लोकसभेच्या निवडणुकीत उमटणार आहेत. त्यात तूर्तास तरी फायद्यात दिसतेय ती भाजपा! विखे पाटलांनी खेळलेल्या या दमदार खेळीत कर्डिलेंना थेट जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागली. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या कर्डिलेंचे यानिमित्ताने राजकीय पूनर्वसन झाले. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून शिवाजीराव कर्डिले यांचे नाव पुढे आले तर आश्चर्य वाटायला नको! लोकसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासाठी या मतदारसंघाची उत्तम मशागत झाली असं म्हटलं तर वावगे ठरु नये.
मत बाद करणारा ‘तो’ संचालक मोठा चतूर!
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक आणि त्या बँकेचा व्यवहार काही कोटींचा! या बँकेत रथीमहारथी संचालक! उच्चशिक्षीत! विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम केलेले मान्यवर या बँकेत संचालक! अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आणि त्यात एका संचालकाचे मत बाद ठरविण्यात आले. अर्थात निवडणुक चुरशीची असताना हे मत बाद होतेच कसे? सारे काही ठरवूनच त्या संचालकाने त्याचे मत बाद करून टाकले! अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्या उत्तरेतील राष्ट्रवादीच्याच म्हणजेच पवार समर्थक असणार्या संचालकाने स्वत:चे मत बाद करून टाकले आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाचा रस्ता मोकळा करुन दिला.
COMMENTS