पाण्याच्या टाकीत डोकावताना चिमुकल्याचा तोल गेला टाकीत पडल्याने जागेवरच मृत्यू झाला पुणे । नगर सहयाद्री - पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक...
पाण्याच्या टाकीत डोकावताना चिमुकल्याचा तोल गेला टाकीत पडल्याने जागेवरच मृत्यू झाला
पुणे । नगर सहयाद्री -
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. पाण्याच्या टाकीत पडून एका ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभय रामदास दोरगे (वय ५ वर्ष ६ महिने) असं मृत मुलाचे नाव असून त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या मिळालेल्या माहितीनुसार, रामदास दोरगे यांचा पोल्ट्री फार्म आहे. पोल्ट्री फार्मसाठी एक सिमेंटची पाच फूट खोल अशी पाण्याची टाकी बांधलेली आहे. त्यांना दोन मुले असून त्यांची दोघे मुलं अक्षय आणि अभय घरासमोर खेळत होती. खेळता खेळता या पाण्याच्या टाकीकडे गेली. त्यातील लहान मुलगा अभय हा पाण्याच्या टाकीकडे गेला. पाण्याच्या टाकीकडे डोकवत असताना अचानक अभयचा तोल गेला. तोल गेल्याने तो पाण्याच्या टाकीत पाच फुटावर जोरात आपटला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
मुलगा पडल्याचे समजल्यावर दोरगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला दवाखान्यात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली.अभय हा दोरगे यांचा छोटा मुलगा होता. सर्वात छोटा असल्याने तो सर्वांचा लाडका होता. त्याच्या अचानक जाण्याने दोरगे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
COMMENTS