राहुल गांधी यांच्यावरील कारवाई विरोधातील आंदोलनात काँग्रेस एकाकी अहमदनगर। नगर सहयाद्री - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्त्व र...
राहुल गांधी यांच्यावरील कारवाई विरोधातील आंदोलनात काँग्रेस एकाकी
अहमदनगर। नगर सहयाद्री -
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्त्व रद्द केल्यानंतर देशात सर्व विरोधी पक्ष एकवटले. त्यांनी आंदोलन केले. राज्यातही महाविकास आघाडी या कारवाई विरोधात एकत्र आल्याचे दिसून आले. मात्र नगर जिल्ह्यात आणि शहरात ही महाविकास आघाडी कुठेही दिसून आली नाही. हे आंदोलन करताना काँग्रेस एकाकी पडल्याचेच दिसून आले.
मोदी अडनावावरून राहुल गांधी यांनी चार वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून हे सारे रामायण घडले आहे. गुजरातमधील पुर्णेश मोदी या विरोधात न्यायालयात गेले. राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला. त्याच्या सुनावण्या झाल्यानंतर सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. नियमानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक सजा झाल्यास खासदार, आमदार यांचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यानुसार ही प्रक्रिया झाली आणि राहुल गांधी ‘माजी खासदार’ झाले. ही सर्व कायदेशीर प्रक्रिया असली तरी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी यास मोदी सरकारला जबाबदार धरत भाजपवर जोरदार टिका केली. भाजपनेही त्याला प्रतिउत्तर दिले. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरू आहेत.
मग कधी एकत्र येणार?
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील विरोधी पक्षांची एकी अत्यावश्यक आहे. राजकीय मते विभिन्न असली तरी भाजपला विरोध यावर सर्वांचे एकमत आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांना हा मुद्दा मिळाला होता. या निमित्ताने एकी दिसून आली असती. अशावेळी एकत्र यायचे नाही, तर मग कधी एकत्र यायचे अन भाजप, मोदी यांना विरोध करायचा, असा प्रश्न एका काँग्रेस नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर उपस्थित केला.
नगरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. तसेच महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे. या तुलनेत काँग्रेस कुठेच नाही. तरीही एकट्या काँग्रेसने हा किल्ला लढविला. ते लढविताना काँग्रेसच्या येथील नेतृत्त्वाला जुने कार्यकर्ते एकत्र करण्यात यश आले नसले तरी त्यांनी आंदोलनाची प्रक्रिया पूर्ण केली. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवकही या आंदोलनात नव्हते. हा प्रकार गटबाजीतून झाला की अन्य काही कारण, ते समजू शकले नाही. मात्र महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने सहभाग घेण्याचे टाळले. आमदारकी आणि महापालिकेत सत्ता असल्याने सध्या राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शहरात बलवान आहेत. मात्र याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला फारसा फायदा झालेला नाही. जे शहरात घडले तेच जिल्ह्यात घडले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तर आंदोलने झाली नसल्याचे सांगण्यात येते श्रीगोंद्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी सभापती अनुराधा नागवडे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनाची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. या सर्व प्रकारावरून नगर शहरासह काँग्रेस एकाकी पडल्याचे दिसून आले.
COMMENTS