नवी दिल्ली वृत्तसंस्था- नवरी नटली लग्नाचा मंडप सजला, वऱ्हाडीदेखील आले मात्र, नवरदेवाचा पत्ताच नाही. वधुपक्षाने संपूर्ण रात्रभर वरातीची वाट प...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
नवरी नटली लग्नाचा मंडप सजला, वऱ्हाडीदेखील आले मात्र, नवरदेवाचा पत्ताच नाही. वधुपक्षाने संपूर्ण रात्रभर वरातीची वाट पाहिली पण शेवटपर्यंत वरात आलीच नाही. वैतागलेल्या वधुपक्षाने महिला हेल्प लाइन व स्थानिक पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास करता नवरदेवाबाबत मिळालेली माहिती ऐकून नवरीला व तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बीजपुर येथील रामसहाय गौड यांच्या मुलीचे गोरखपुर येथील एका मुलाशी ठरलं होतं. मुलीच्या वडिलांनी सर्व तयारी करुन ठेवली होती. वरातीचं स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज होते. मात्र नवरदेव वरात घेऊन आलाच नाही. शेवटी नवरीने वैतागून महिला हेल्प लाइनला फोन करुन मदतीची मागणी केली. याविषयी माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले व तपास सुरु केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरीची सावत्र आईची इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघंही एकमेकांसोबत बोलू लागले तसंच, त्यांच्यातील जवळीकदेखील वाढू लागली. सावत्र आईने तिच्या सावत्र मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव तिच्या प्रियकरासमोर ठेवला. त्यानंतर सावत्र आईने घरच्यांना याबाबत सांगितलं व त्यांना लग्नासाठी तयार केलं.
नवरीच्या घरचे व मुलाचे घरच्यांचे फक्त फोनवरच बोलणं होतं होतं. वधुच्या घरच्यांनी नवरदेवाचं घरही प्रत्यक्षात न बघता लग्न ठरवलं. दोन्ही कुटुंबीयांचे बोलणे फक्त फोनवरच होत होते. फोनवरच लग्नाची तारीखही काढण्यात आली. वधुच्या वडिलांनी कर्ज काढून लेकीच्या लग्नाची तयारी केली. लग्नाच्या पत्रिकादेखील छापल्या.पोलिसांनी याबाबत नवऱ्यामुलाला जाब विचारताच त्याने दिलेले उत्तर एकून सगळेच आश्चर्यचकित झाले.
नवऱ्यामुलाने लग्नाबाबत कोणतंही बोलंण झालं नसल्याचं म्हटलं आहे. नवरीच्या सावत्र आईसोबत मी फक्त इन्स्टाग्रामवर बोलायचो. काही महिन्यांतर तिने तिच्या सावत्र मुलीसोबत लग्न कर म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तसंच, त्या लोकांनी स्वतःच लग्नाची तारीख काढून तयारी सुरु केली. यात आमच्या कोणाचीच काही चूक नाहीये, असंही तो म्हणाला.
COMMENTS