भाजपा व शिंदे गटांच्या पदाधिकार्यांची मागणी | राष्ट्रवादी काँग्रेसचेही शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब पारनेर | नगर सह्याद्री जिल्हा सह...
भाजपा व शिंदे गटांच्या पदाधिकार्यांची मागणी | राष्ट्रवादी काँग्रेसचेही शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब
पारनेर | नगर सह्याद्री
जिल्हा सहकारी बँकेच्या सोसायटी मतदार संघातील जागेवर दिवंगत अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांची बिनविरोध निवड करावी, अशी लेखी मागणी अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे भाजपा व शिंदे गटांच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंबधीचे निवेदन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, युवा नेते राहुल शिंदे, सावली प्रतिष्ठानचे डॉ. भाऊसाहेब खिलारी, जनसेवा फौंडेशनचे सचिन वराळ, माजी सभापती गणेश शेळके, शिवाजी खिलारी, संजय झावरे यांनी दिले आहे. दुसरीकडे राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून गीतांजली शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
पारनेर भाजपाचा राजकीय सुसंस्कृतपणा..
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या रिक्त जागेवर गितांजली शेळके यांची बिनविरोध निवड करावी यासाठी पारनेरच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, वसंतराव चेडे यांनी पुढाकार घेतला आहे.पारनेर तालुयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा असली तरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे या संचालक पदाच्या रिक्त जागेवर गितांजली शेळके यांची बिनविरोध निवड करावी, अशी मागणी करुन पारनेर भाजपा व शिंदे गटाने राजकीय सुसंस्कृतपणा दाखविला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गीतांजली शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांत्वन पर शेळके कुटुंबीयांना भेट दिली होती. या भेटीदरम्यान दिवंगत सॉ. गुलाबराव शेळके व उदय शेळके यांचे सहकारात मोठे योगदान असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी संधी देण्याबाबत आमदार निलेश लंके यांच्याशी चर्चा पण झाली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी पदाधिकार्यांशी व प्रमुख नेत्यांची चर्चा केल्यानंतर गीतांजली शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी भाजप शिंदे गटाने बिनविरोध निवडीचा प्रस्ताव ठेवल्याने आता गीतांजली शेळके यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
COMMENTS