अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक हालचालींना वेग | शेतकरीही लागले तयारीला सुनिल चोभे | नगर सह्याद्री ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी स...
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक हालचालींना वेग | शेतकरीही लागले तयारीला
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, व्यापारी, हमाल मापाडी यांच्यासह आता बाजार समितीची निवडणूक शेतकर्यांनाही लढवता येणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या मतदारांबरोबरच शेतकरीही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. असे असले तरी शेतकर्यांना मात्र मतदानाचा अधिकार नाही. शेतकर्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाल्याने बाजार समित्यांच्या निवडणुका आणखीन रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या सदस्यांची नावे समाविष्ट करुन अंतिम मतदार यादी सोमवारी (दि. २० मार्च) प्रसिद्ध झाली. मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने सत्ताधार्यांसह विरोधक निवडणुकीच्या तयारीला सज्ज झाले आहेत. नेते मंडळींकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. दरम्यान, होऊ घातलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये राज्य सरकारच्या सहकार विभागाने यंदा शेतकर्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी शेतकर्यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. बाजार समिती निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था सदस्य, व्यापारी, हमाल व मापाडी यांना मतदान अधिकार आहे. शेतकर्यांना निवडणूक लढविता येणार असल्याने अनेक शेतकर्यांकडून तालुक्याच्या नेते मंडळींकडे उमेदवारीची मागणी होवू शकते.
निवडणूक लढविता येणार, पण..: जिल्हा उपनिबंधक पुरी
आगामी होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकर्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु, शेतकर्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. ज्यांच्या नावावर सात-बारा, आठ अ असेल त्याच शेतकर्यांना निवडणूक लढविता येणार आहे. मतदारयादी व्यतिरिक्त व्यक्तीला मतदान करता येणार नाही, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलतांना सांगितली.
अनेक शेतकरी इच्छुक झाल्यास नेतेमंडळींची डोकेदुखी वाढू शकते. तसेच शेतकर्यांचा निवडणुकीत विचार न केल्यास आगामी निवडणुकीत शेतकर्यांच्या रोषाचा सामना नेतेमंडळींना करावा लागू शकतो. शेतकर्यांना निवडणुकीचा अधिकार मिळाल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने कोणत्याही क्षणी बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
शेतकर्यांना प्रतिनिधीत्व द्यावे लागणार
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शेतकर्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला आहे. शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून म्हणून निवडणुकीत पॅनेलमध्ये एखाद्या का होईना शेतकर्यास सत्ताधारी-विरोधकांना संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीची संधी शेतकर्यांना मिळते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाल्याने बाजार समिती निवडणुकीमध्ये शेतकर्यांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.
COMMENTS