तेलंगणा । नगर सह्याद्री - तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राश...
तेलंगणा । नगर सह्याद्री -
तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर अभियंता, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असावी, असा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणातील हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कुटुंबातील चार जण एकत्र मृतावस्थेत आढळले आहे. यामध्ये अभियंता, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. मुलांच्या प्रकृतीमुळे पती-पत्नीने असे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कुशाईगुडा पोलिसांनी सांगितले की, जी सतीश ( वय,३९), त्यांची पत्नी जी वेद ( वय, ३५) आणि त्यांची मुले, जी निशिकेत (वय, ९) आणि जी निहाल ( वय, ५) हे त्यांच्या कांडीगुडा येथील पार्क रॉयल अपार्टमेंट फ्लॅटमध्ये दुपारी मृतावस्थेत आढळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश घरून काम करत होता.
घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की मुलांच्या दीर्घ आजारामुळे त्यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर या दाम्पत्याने हे कठोर पाऊल उचलले असावं, असा पोलिसांना संशय आहे. फ्लॅटमध्ये शीतपेयाची रिकामी बाटली, अज्ञात पावडर असलेली बाटली आणि रिकामे ग्लास आढळून आले. पोलिसांनी CrPC कलम 174 अंतर्गत संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे.
COMMENTS