अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहर व उपनगरात गुरुवारी सर्वत्र श्रीरामनवमी उत्साहात साजरा करण्यात आला आहे. प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव निमित्त...
नगर शहर व उपनगरात गुरुवारी सर्वत्र श्रीरामनवमी उत्साहात साजरा करण्यात आला आहे. प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारनंतर नगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यात प्रभू श्रीराम यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे रथात ठेवण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारून अहिल्यानगर नामकरण व अखंड हिंदू राष्ट्र संकल्पनेवर आधारीत प्रतिकृतीद्वारे अखंड हिंदू राष्ट्र निर्मितीची मागणी मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होती.
दुपारी चार वाजता बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. अग्रभागी घोडेस्वार, बाल वारकर्यांचे पथक, प्रभूंची पालखी, प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती पारंपारिक वाद्य पथक, लहान मुलांचे लाठ्या काठ्या पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हिंदू राष्ट्र सेना, त्या पाठोपाठ सकल हिंदू समाज व वर्चस्व ग्रुप अशा तीन संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. डीजेच्या दणदणाटात व विद्युत रोषणाईचा झगमगाट, लेझर शो व तरुणाईच्या प्रचंड गर्दीत मिरवणूक उत्साहात पार पडली.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, संपतराव शिंदे यांच्यासह कोतवाली पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, गोपनीय शाखेचे कर्मचारी अशी विविध पथके तैनात करण्यात आली होती.
COMMENTS