श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुक्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. घातक रसायनांचा वापर करून दूध बनवण्याचा गोरखधंदा अन्न...
श्रीगोंदा तालुक्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. घातक रसायनांचा वापर करून दूध बनवण्याचा गोरखधंदा अन्न व औषध प्रशासनाने काष्टी येथील वांगदरी रस्त्याच्या कडेला राहणार्या बाळासाहेब बाबुराव पाचपुते यांच्या घरी छापा टाकून उघडकीस आणला आहे.
शरीरास अपायकारक असलेल्या रसायनांचा वापर करून तयार केलेले ४३० लिटर दूध अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी पोलिसांच्या मदतीने नष्ट केले. गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब बाबुराव पाचपुते गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. आरोपीस भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पुरविणारा संदीप संभाजी मखरे, (रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने तो स्वतः भेसळयुक्त दूध तयार करत असल्याची माहिती दिली. त्याने श्रीगोंदा व परिसरातील काही लोकांना भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी लागणारे पदार्थाची विक्री केल्याची कबुली दिली. आरोपी संदीप मखरे याने सांगितल्या प्रमाणे तो दूध भेसळ करण्याकरिता वैभव रामदास राऊत (वय २५, रा. बोरुडेवाडी, ता. श्रीगोंदा), दीपक विठ्ठल मखरे (वय ३२,रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा), नीलेश तुकाराम मखरे (वय ३२, रा. मखरेवाडी), संदीप बबन राऊत (वय ३६, रा. बोरुडेवाडी, ता. श्रीगोंदा) यांना साहित्य पूरविले. तो स्वतः भेसळ युक्त दुध तयार करत असल्याने अटक केली आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली , व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व समीर अभंग यांच्या सहकार्याने कर्मचारी गोकुळ इंगवले, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, अंकुश ढवळे, गणेश साने, रवी जाधव हे पुढील तपास करत आहेत.
दूध भेसळ प्रकरणात श्रीगोंद्यातील रॅकेट उघडकीस आल्याने दररोज तालुयातून एक लाख साठ हजार लिटर दूध रोज संकलन होणारे दूध रेड झाल्यापासून फक्त ७० हजार लिटर दूध संकलन होत आहे.म्हणजेच श्रीगोंदा तालुक्यात रोज ९० हजार लिटर भेसळयुक्त दूध तयार होऊन तालुयातील डेअरीला जात आहे, अशी तालुयात चर्चा आहे.
COMMENTS