अहमदनगर | नगर सह्याद्री कोरोनापेक्षाही भयानक म्हटला जाणार्या आणि देशावर सावट असलेल्या ‘एच३ एन२‘ इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर) महाराष्ट्रातील ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
कोरोनापेक्षाही भयानक म्हटला जाणार्या आणि देशावर सावट असलेल्या ‘एच३ एन२‘ इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर) महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा मृत्यू नगरमध्ये झाला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या २३ वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, नगरच्या जवळच असलेल्या पुणे येथे या विषाणूने थैमान घातले आहे.
नगरमध्ये बळी गेलेला २३ वर्षीय तरूण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. गत आठवड्यात तो ट्रीपसाठी कोकणात गेला होता. तेथून आल्यानंतर आजारी पडला. त्याची कोवीड टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल केले. तेथील तपासणीत कोवीडसोबतच ‘एच३ एन२’ इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानुसार त्याला रेमडेसिवीरसोबत आवश्यक ते डोस देण्यात आले. मात्र सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. हरियाणा आणि कर्नाटकात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रात ‘एच३ एन२’ इन्फ्लुएन्झाचा पहिला व देशातील तिसरा बळी या विषाणूने घेतला आहे.
नगरमध्ये ताप, खोकला असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच नगरचा नियमित संबंध येणार्या पुणे जिल्ह्यात ‘एच३ एन२‘ने थैमान घातले आहे. विशेषतः हा विषाणू मुलांसाठी धोकादायक बनला आहे. पाच वर्षांखालील मुले याच्या विळख्यात येत असल्याचे डॉटरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये आयसीयू तुडुंब भरले आहेत. बाधित बहुतेक मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाधित मुलांवर अँटीबायोटिक देखील काम करत नाहीत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१३ पासून पुण्यात एकूण २,५२९ नमुने तपासण्यात आले. यापैकी ४२८ (सुमारे १७ टक्के) ‘एच३ एन२‘ विषाणू पॉझिटिव्ह आढळले आहेत. १५ फेब्रुवारीनंतर घेतलेल्या नमुन्यांमध्ये या विषाणूने ग्रस्त मुलांची संख्या सर्वाधिक आहे. एनआयव्हीच्या शास्त्रज्ञ डॉ. वर्षा पोतदार यांनी सांगितले की, हे नमुने गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोमची लक्षणे असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांचे आहेत.
पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये गेल्या ४-६ आठवड्यांपासून आयसीयू तुडुंब भरले आहेत. भारती हॉस्पिटलमधील बालरोग विभागाच्या प्रभारी डॉ. भक्ती सारंगी म्हणाल्या, आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल बहुतांश मुले लहान आणि शाळकरी आहेत. त्यापैकी काहींना यकृत आणि रक्तदाबाशी संबंधित समस्याही होत्या. अशा परिस्थितीत त्यांना व्हेंटिलेटरच्या आधाराची गरज आहे. त्यापैकी बहुतेक पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. बहुतेक मुलांनी श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि तापाची तक्रार केली. न्यूमोनिया सारखी लक्षणे देखील आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे इंटेन्सिव्हिस्ट डॉ. भरत पुरंदरे म्हणाले, केवळ ‘एच३ एन२‘ नाही तर कोविड आणि ‘एच३ एन२‘ संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ‘एच३ एन२‘मुळे मोठ्या संख्येने मुले दाखल होत आहेत.
भारतात जानेवारी ते मार्च हा काळ फ्लूचा हंगाम मानला जातो. यादरम्यान लोकांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसतात. हा फ्लू हंगाम खूप वेगळा आहे. आता तर रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे, पण त्यांचा खोकलाही आठवडाभर बरा होत नाहीये. आयसीयूमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण दाखल करावे लागत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरचा असा विश्वास आहे की, याचे कारण ‘एच३ एन२‘ विषाणू असू शकते, जो भारतात वेगाने पसरत आहे.
नागपुरात एक बळी, पुण्यात धोका वाढला
‘एच३ एन२‘ मुळे नागपुरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मधुमेहासह उफरक्तदाबाचा त्रास असलेल्या 78 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणेध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता राज्यात नवे संकट उभे राहिले आहे. कोरोनानंतर आता ‘एच३ एन२‘ चे देशभरात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पुण्यानंतर नागपुरातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यातच अहमदनगरमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूमुळे आता राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
COMMENTS