नवी दिल्ली / वृत्तसंस्था- राजधानी दिल्लीतील शास्त्री पार्क मधील एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री डास मारण्यासाठी कॉइल लावली मात्र त्यामु...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था-
राजधानी दिल्लीतील शास्त्री पार्क मधील एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री डास मारण्यासाठी कॉइल लावली मात्र त्यामुळं एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घरातील लोक डास मारण्यासाठी येणारी कॉइल लावून झोपले होते. त्याचवेळी कॉइलमुळं उशीला आग लागली. आग भडकल्यामुळं दोघं गंभीररित्या भाजले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर, चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सकाळीच एका घरातील काही लोक घरात बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसानी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी आठपैकी सहा जणांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.हसत खेळत कुटुंब एका क्षणात संपल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
डास मारण्यासाठी असलेल्या कॉइलमध्ये डीडीटी, अन्य कार्बन फॉस्फोरस आणि घातक रासायनिक घटक असतात. त्यामुळं बंद खोलीत डास मारण्याची अगरबत्ती वा कॉइल लावून झोपण्यामुळं आतील गॅस बाहेर पडण्यासाठी जागाच नसते. कॉइल जळत राहिल्यामुळं संपूर्ण खोलीत कार्बन मोनोक्साइड पसरतो आणि त्यामुळं ऑक्सिजनची मात्रा कमी होते. हळूहळू कार्बन मोनोक्साइड व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळं त्याला श्वास होण्यास त्रास होतो आणि गुदमरुन जीव जाण्याची शक्यता वाढते.
COMMENTS