अहमदनगर | नगर सह्याद्री थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह पथकाला मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी भिस्तबाग, ब...
अहमदनगर | नगर सह्याद्री
थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह पथकाला मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी भिस्तबाग, बंगाल चौकीजवळ घडली. याप्रकरणी अभियंता स्वप्नील संजयराव उल्हे (वय ३५ ह. रा. वसंत टेकडी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुक्तार शेख व शब्बु शेख यांच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील गंजबाजार कार्यालयात फिर्यादी उल्हे सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ते पथकासह थकित वीजबील ग्राहकांच्या घरी जाऊन वीज बील भरण्याबाबत सूचना देत होते. बुधवारी (दि. २९) दुपारी ते त्यांचे सहकारी प्रधान तंत्रज्ज्ञ अविनाश भोसले, बाह्यस्त्रोत कर्मचारी मुंबशीर सय्यद, अमित गायकवाड यांच्यासह माळीवाडा परिसरात वीज थकबाकी वसुलीची मोहिम राबवीत होते. ग्राहक जानसाहेब सरदार साहेब यांचे वीज थकबाकी असल्याने त्यांचे घरी ते गेले.
त्यांच्या घरी मुक्तार शेख व शब्बू शेख भाडेकरू होते. त्यांना वीजबिल भरणे बाबत विचारले असता त्यांनी ‘आम्ही इतके वीजबील भरू शकत नाही’, असे म्हणाल्याने पथकाने त्यांना, ‘तुम्हाला वीजबील भरावे लागेल, याआधीही तुम्ही वीजबील न भरल्याने तुमचे कनेशन कापले. तरीही तुम्ही गैरप्रकारे वीज जोडली आहे. तुम्ही वीजबील भरा नाहीतर आम्हाला मीटर काढून घ्यावे लागेल’, असे म्हणाल्याने मुक्तार शेख याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच शब्बू शेख याने तेथे पडलेली वीट घेऊन पथकाच्या अंगावर धाऊन गेला.
त्यावेळी पथकातील कर्मचार्यांनी वीट पकडली असता त्याने हाताने व लाथेने मारहाण केली. त्यानंतर कर्मचारी मुबशीर सय्यद त्यास समजण्यासाठी बाजुला घेऊन गेले. त्यानंतर कर्मचार्यांनी वीज मीटर काढले असताना शब्बू शेख पुन्हा लोखंडी रॉड घेऊन अंगावर धाऊन गेला. शिवीगाळ करून, ‘तुम्हाला पाहुन घेतो,’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा केला.
COMMENTS