मर्चंटस् बँकेच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत व्हाईस चेअरमनपदी अमित मुथा यांची एकमताने निवड अहमदनगर | नगर सह्याद्री- अहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँक...
मर्चंटस् बँकेच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत व्हाईस चेअरमनपदी अमित मुथा यांची एकमताने निवड
अहमदनगर | नगर सह्याद्री-
अहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँके च्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत तर व्हाईस चेअरमनपदी अमित मुथा यांची एकमताने निवड झाली आहे. नूतन पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांना सहकार अधिकारी विक्रम मुटकुळे, अल्ताफ शेख यांनी सहाय्य केले.
या बैठकीत चेअरमनपदासाठी हस्तीमलजी मुनोत यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा यांनी केली. त्यांना सी.ए.मोहन बरमेचा यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी अमित मुथा यांच्या नावाची सूचना सीएआयपी अजय मुथा यांनी केली. त्यांना किशोर गांधी यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संचालक तथा माजी चेअरमन आनंदराम मुनोत, माजी व्हा.चेअरमन सुभाष बायड, संचालक कमलेश भंडारी, संजय बोरा, संजय चोपडा, किशोर मुनोत, संजीव गांधी, प्रमिलाताई बोरा, मीनाताई मुनोत, विजय कोथंबिरे, सुभाष भांड, जॉइंट सीईओ नितीन भंडारी आदी उपस्थित होते.
चेअरमन मुनोत म्हणाले की, मर्चंटस् बँक ही व्यापारी व सर्वसामान्यांची हक्काची बँक आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात झालेल्या निवडणुकीत सभासदांनी पुनश्च एकदा जनसेवा मंडळाच्या चांगल्या कारभारावर शिक्कामोर्तब केले आहे. मर्चंटस् बँक अशी बँक आहे की जिथे कर्जासाठी संचालकांकडे जाण्याची गरज नाही. प्रशासकीय विभागच ते काम करून देतो. सभासदांना आजपर्यंत भरघोस भाग नफा दिलेला आहै. अपघात विम्याचा प्रिमियम बँकेने भरला आहे. सभासद कल्याण निधी उभारला आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ठेवीवर अतिरिक्त व्याज देण्यात येत आहे. कर्जाचा व्याजदरही कमी आहे. काळानुरुप अधिकाधिक डिजीटल बँकिंग सेवा देण्यासाठी कटिबध्द आहोत व बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रयत्नरत राहू.
गणेश पुरी म्हणाले की, सहकारी बँकिंग सध्या वेगळ्या टप्प्यावर आहे. असे असले तरी मर्चंटस् बँक रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार अतिशय चांगले काम करीत आहे. शेवटच्या घटकापर्यंत सहकारी बँकिंगचा लाभ पोहचण्याचे काम याठिकाणी अविरतपणे चालू आहे. आभार व्यक्त करताना व्हा.चेअरमन मुथा म्हणाले की, माझे वडील विजयकुमार मुथा यांनी हस्तीमलजी मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेत योगदान दिले आहे. आता मला ही संधी मिळाली आहे. त्याचे सोने करण्याचा प्रयत्न राहिल. यावेळी मुनोत व मुथा समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. यावेळी असंख्य व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS