अहमदनगर | नगर सह्याद्री अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर महानगर शाखेच्या वतीने देण्यात येणारा नाट्य गौरव पुरस्कार नगरचे ज्येष्ठ नाट्य अ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर महानगर शाखेच्या वतीने देण्यात येणारा नाट्य गौरव पुरस्कार नगरचे ज्येष्ठ नाट्य अभिनेते पी. डी. कुलकर्णी व बाल शंकर महाराजांची भूमिका साकारणारा नगरचा बाल कलाकार आरुष बेडेकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती महानगर शाखेचे अध्यक्ष संजय लोळगे यांनी दिली.
रविवार दि. १९ मार्चला सायंकाळी ७ वाजता पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात सर्व नाट्यकर्मी व रसिक नगरकरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती शाखेचे उपाध्यक्ष क्षितिज झावरे यांनी दिली. पी. डी. कुलकर्णी मागील ५० वर्षाहून अधिक काळ नगरच्या हौशी रंगभूमीवर कार्यरत आहेत. या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी अभिनयाचे रौप्य पदक मिळवले आहे. तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांनी १ महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात ‘मी हिंदुस्तानी’ या एकांकिकेचे ८७ प्रयोग सादर करून नवा विक्रम केला आहे.
आरुष बेडेकर याने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बाल शंकर महाराजांची भूमिका साकारून महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांचीही मने जिंकली. नुकताच आरुषने मटा सन्मान व कलर्स मराठी वाहिनीचा उत्कृष्ठ बाल कलाकार ही मानाची पारितोषिके पटकाऊन नगरचे नाव राज्यात मोठे केले आहे. या दोन्ही कलाकारांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या कार्याचा नगर शहराच्या वतीने सन्मान व्हावा, यासाठी त्यांना नाट्य गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे यांनी सांगितले. या कार्यक्रमात अतिशय मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या कालसर्प लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक अभिजित दळवी, कलर्स अवॉर्ड विजेते प्रसिद्ध नाट्य चित्रपट अभिनेते प्रकाश धोत्रे व अमित रेखी यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रसाद बेडेकर व जालिंदर शिंदे यांनी दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत जठार, तुषार देशमुख, अभय गोले, सतीश रोकडे, सुधीर कुलकर्णी व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत.
COMMENTS