अहमदनगर | नगर सह्याद्री नगर अर्बन बँकेतून घेतलेल्या सुमारे तीन कोटी रुपये कर्जाच्या रकमेचा गैरवापर करत श्रीगोंदे तालुयात सुमारे ७० एकर जमीन ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर अर्बन बँकेतून घेतलेल्या सुमारे तीन कोटी रुपये कर्जाच्या रकमेचा गैरवापर करत श्रीगोंदे तालुयात सुमारे ७० एकर जमीन खरेदी करण्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. या जमिनीचे पुढील खरेदी व विक्रीचे व्यवहार थांबविण्याबाबत महसूल व भूमिअभिलेख विभागाला पत्र दिल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली.
माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून दाखल नगर अर्बन बँकेतील १५० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बँकेच्या काही माजी पदाधिकार्यांनी कर्जत व श्रीगोंदे तालुयाच्या काही भागातून महामार्ग जाणार असल्याने त्यावेळी जमिनीला किंमत येईल, या उद्देशाने श्रीगोंदे तालुयातील एका गावात सुमारे ७० एकर जमीन खरेदी करून ठेवली आहे. या जमीन खरेदीसाठी बँकेतून पैसे वर्ग झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तातडीने संबंधित जमिनीच्या विक्रीचे व्यवहार पाहून शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर या जमिनीच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारावर निर्बंध घातले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक ऑडिटमधून या पैशांचा वापर कुठे झाला, या रकमा कोणापर्यंत पोहोचल्या याची माहिती समोर येत आहे. एका जमीन खरेदीसाठी कर्जाच्या रकमेचा वापर झाल्याचे समोर आले असले, तरी अशी आणखी इतर प्रकरणे समोर येऊ शकतात, असे सांगत फॉरेन्सिकचा अंतिम अहवाल लवकरच येईल, असे उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.
COMMENTS