माजी आमदार शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी विजयी; महाविकास आघाडीला विखेंचा धोबीपछाड अहमदनगर | नगर सह्याद्री आशिया खंडात नावाजलेली अहमदनगर जिल्हा म...
माजी आमदार शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी विजयी; महाविकास आघाडीला विखेंचा धोबीपछाड
अहमदनगर | नगर सह्याद्री
आशिया खंडात नावाजलेली अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत अनपेक्षितपणे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी एका मताने विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखऱ घुले यांचा पराभव केला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी बुधवारी निवडणूक झाली. जिल्हा बॅकेत राष्ट्रवादीचे दहा, काँग्रेसचे चार, भाजपचे सहा आणि शिवसेनेचे एक असे संचालक आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने बँकेत त्यांचाचअध्यक्ष होईल, अशी खात्री होती. मात्र अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. सुजय विखे आणि शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या हालचाली या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरल्या. अध्यक्षपदाच्या निवडीच्या पूर्वसंध्येला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नगरच्या दौर्यावर असताना त्यांनी या संदर्भात काही प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानुसार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव निश्चित करण्यात आले.
बुधवारी सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी घुले व कर्डिले असे दोघांचे अर्ज दाखल झाले. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी दोन्हीकडून प्रयत्न झाले, मात्र दोन्हीकडून अध्यक्षपदावर हक्क सांगण्यात आला. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही. २१ संचालक असलेल्या बँकेत अॅड. उदय शेळके यांच्या निधनानंतर संचालकांची संख्या २० वर आली. बिनविरोधची चर्चा फिसकटल्यानंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. मतमोजणीमध्ये अवघे सहा संचालक असलेल्या भाजप उमेदवार शिवाजी कर्डिले यांना दहा मते मिळाल्याचे समोर आले. तसेच चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. एक मत बाद झाले. समोर आलेल्या निकालामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नेतेही हादरले. कर्डिले यांची निवड झाल्याचे समजताच कर्डिले समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी बँकेसमोर फटाके फोडत जल्लोष केला.
चंद्रशेखर घुले यांच्या नावाला विरोध?
अहमदनगरची जिल्हा बँक राज्यात नावाजलेली आहे. अॅड. उदय शेळके यांच्या निधनानंतर बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, प्रशांत गायकवाड यांच्यात रस्सीखेच होती. मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व पदाधिकार्यांमध्ये बैठक झाली. बैठकीत चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे यांची नावे आघाडीवर होती. घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु, काही संचालकांचा मुरकुटे यांना अध्यक्ष करा असा व्होरा होता.
ही मैत्रिपूर्ण लढत ः खा. विखे
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेली लढत ही मैत्रिपूर्ण आहे. त्यामुळे याकडे स्पर्धा म्हणून पाहू नये. भाजपचे सहा संचालक असल्याने त्यांना सत्तेत वाटा आवश्यक होता. त्यासाठी तडजोडी महत्त्वाच्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सहकारात राजकारण नको, या भूमिकेशी आम्ही आजही कायम आहोत. मात्र भाजप संचालकांना दूर ठेवले जात असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात आले. सर्वांच्या सहकार्यातून यश प्राप्त झाले. भाजपचे संचालकही ज्येष्ठ आहेत, मात्र त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार केला जात नव्हता. या निवडणुकीतील निकाल हे त्यातूनच निर्माण झालेली नाराजी असल्याचे खा. सुजय विखे म्हणाले.
हीच विखे यांची ख्याती ः कर्डिले जिल्हा बँकेत अवघे सहा संचालक असताना दहा मते कशी मिळविली, असा प्रश्न पत्रकारांनी कर्डिले यांना विचारला. त्यावेळी त्यांनी यावर मिश्किलपणे उत्तर देत ‘हीच तर विखे यांची ख्याती आहे’ असे म्हटले.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार ः कर्डिले
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, जिल्हा बँक संचालक मंडळाची निवडणूक झाली, त्यावेळी आम्ही सर्वांनीच मदत केली होती. सहकारात राजकारण नको म्हणून आमची भूमिका मदतीची राहिली. त्यानंतर सत्तेत भाजपला वाटा मिळावा, असा आमचा प्रयत्न होता. तसा प्रस्ताव त्यावेळचे सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर मांडला. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. आजच्या निवडीसंदर्भात काल ज्या बैठका झाल्या, त्यापासूनही भाजपला बाजुला ठेवण्यात आले. त्यामुळे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. पक्षाने जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. संचालकांमध्ये अगोदरच नाराजी होती. आज देखील आम्ही बँकेची परंपरा जपण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र त्यासही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर निवडणूक झाली. मला अध्यक्षपदाची संधी मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. सुजय विखे यांचा मोठा हात आहे. निवडणूक झाली असली तरी यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. बँकेच्या ठेवी वाढविण्याबरोबरच सर्वसामान्य व्यावसायिक, शेतकरी, बचत गट यांना सर्वाधिक मदत देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
COMMENTS