अहमदनगर | नगर सह्याद्री- महिलांना फक्त आदर हवा आहे. आदर नसल्याने कुटुंबात तंटे निर्माण होतात. स्त्री-पुरुष समानतेमध्ये महिलांना स्वारस्य नाह...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
महिलांना फक्त आदर हवा आहे. आदर नसल्याने कुटुंबात तंटे निर्माण होतात. स्त्री-पुरुष समानतेमध्ये महिलांना स्वारस्य नाही, कारण महिला अगोदरच आपल्या कर्तुत्वाने पुढे गेल्या आहेत. प्रत्येक स्तरावर महिलांना आदर मिळाला पाहिजे. महिलांनी स्वतःची शक्ती ओळखून पुढे जाण्याची गरज आहे. सक्षम होण्यासाठी महिलांना शिक्षण आवश्यक आहे. जिल्ह्यात बालविवाहचे प्रमाण गंभीर बाब असून, हे रोखण्यासाठी महिलांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी केले.
येथील कौटुंबिक न्यायालयात महिला-पुरुष समानतेचा जागर करुन महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणार्या रणरागिणींचा व तृतीय पंथीयांचा सन्मान करण्यात आला. महिला दिनाच्या कार्यक्रमात तृतीय पंथीयांना सामावून त्यांचा देखील सन्मान झाल्याने त्यांचे मन भरुन आले. अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालय, न्यायाधार, कौटुंबिक न्यायालय वकील संघ, अहमदनगर जिल्हा व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात महिला दिनाचा कार्यक्रम रंगला होता. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेताजी कंक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश शरद देशपांडे, अभिजीत देशमुख, औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एस.एन. सोनवणे, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवाजी कराळे, उपाध्यक्ष अॅड. लक्ष्मण कचरे, सेंट्रल बारचे अध्यक्ष अॅड. के.एम. देशपांडे, अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संजय पाटील, उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ शिर्के, अॅड. सुरेश लगड, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अॅड. निर्मला चौधरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात अॅड. निर्मला चौधरी यांनी प्रेमाचे प्रतीक असलेल्या महिलेकडे आज भोगाच्या नजरेने पाहिले जात आहे. या प्रवृत्तीमुळे महिलांना संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. महिला व मुलींना जपण्याचे दिवस आले असून, याचे आत्मचिंतन होण्याची आवश्यकता आहे. मुली स्वतःचे संरक्षण करू शकतात, मात्र समाजाने त्यांचा सन्मान हिरावून घेता कामा नये. जेव्हा महिलांचा सन्मान राखला जाईल तेंव्हा खर्या अर्थाने महिला दिन साजरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते समाजसेवेची बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या विडी कामगार, घरेलू कामगार, पेट्रोल पंम्पावर कार्यरत महिला, महिला पोलीस कर्मचारी व तृतीयपंथी यांचा सन्मान करण्यात आला. न्यायाधीश शरद देशपांडे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषार्थ गाजवत आहे. महिलांची बरोबरी कोणी करू शकत नाही. पुरुष हा कॉमन मॅन असतो, महिला कॉमन नसून ती एक स्पेशल असल्याचे सांगितले व स्त्रियांच्या व्यथा व स्त्रीशक्तीवर कविता त्यांनी सादर केल्या. अॅड. शिवाजी कराळे यांनी महापुरुषांना घडविणार्या सर्व महिलाच होत्या. महिलांनी पिढी घडविताना संस्कार रुजवावे, महिलांना मिळालेला कायद्याचा अधिकार हा ढाल म्हणून वापरला गेला पाहिजे, ते तलवार म्हणून वापरता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायाधीश अभिजीत देशमुख म्हणाले की, कोणत्याही अनिष्ट प्रथेला पायबंद लोकांनी स्वतःहून केले पाहिजे. सतीप्रथा बंद झाली, मात्र हुंडा प्रथा बंद होण्यास तयार नाही. यासाठी संवेदनशीलता निर्माण होण्याची गरज आहे. समाजात मुलगी, आई-बहीण यांच्याप्रमाणे पत्नी व सुनेला वागणुक मिळेल तेंव्हा खर्या अर्थाने तेव्हाच परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी लांडगे व स्नेहल चव्हाण यांनी केले. आभार अॅड. अनिता दिघे यांनी मानले. यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक रमेश वाईकर, समुपदेशक सुषमा बिडवे, न्यायाधारच्या सचिव अॅड. निलिमा भणगे, अॅड. दीक्षा बनसोडे आदींसह महिला वकील, पक्षकार व विविध क्षेत्रात कार्यरत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायाधारच्या सदस्या व महिला वकीलांनी परिश्रम घेतले. कौटुंबिक न्यायालयात झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात तृतीय पंथीय काजल गुरु यांच्या वतीने सोनी छाब्रिया, रोहिणी नगरकर, नायक तमन्ना सुरैय्या, सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळापहाड, उषा वैराळ, विडी कामगारांच्या प्रतिनिधी भारती न्यालपेल्ली, लक्ष्मीताई वाघमारे, दीपिका शेलार यांचा सन्मान करण्यात आला
COMMENTS