अहमदनगर | नगर सह्याद्री बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्यास अनेक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. फास्ट फूड, केमिकलयुक्त अन्न पदार्थ याचा विपरित पर...
अहमदनगर | नगर सह्याद्री
बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्यास अनेक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. फास्ट फूड, केमिकलयुक्त अन्न पदार्थ याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होत आहे.त्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम हा प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी केल्यास वेळीच आजाराचे निदान होऊ शकते. देशात सध्या मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे प्रतिपादन डॉ.वसंत कटारिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित श्री आनंदऋषी हॉस्पिटल आयोजित व सुभाषलाल लुंकड (चाकण मिल) परिवार प्रायोजित मधुमेह, थायरॉईड, ग्रंथी विकार संबंधित आजार मोफत तपासणी शिबीराचे उद्घाटन सुभाषलाल लुंकड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धीरज लुंकड, मनसेचे नितीन भुतारे, अॅड.अनिता दिघे, सुमित वर्मा, तुषार हिरवे, गजेंद्र राशिनकर, प्रकाश गायकवाड, संकेत जरे तसेच डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. पियुष लोढा. डॉ. गजेंद्र गिरी, डॉ. पियुष मराठे, डॉ. जयप्रकाश शिरपूरवार, प्रकाश छल्लानी, डॉ.आशिष भंडारी आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले, आजच्या महाग होत चाललेल्या आरोग्य सेवेत आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील विविध मोफत शिबीरांच्या माध्यमातून रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. पुणे-मुंबईच्या धर्तीवर या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने होत असलेल्या उपचारामुळे रुग्ण पुर्णपणे बरा होऊन घरी जात आहे, ही समाधानाची बाब आहे.डॉ.पियुष लोढा म्हणाले, शरीरिक बदलांचा आपल्या आरोग्यवर परिणाम होत असतो. मनुष्याच्या शरीरातील ग्रंथी विकारामुळे मधुमेहाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यासाठी डॉटरांच्या सल्ल्याने आधीच उपचार होणे आवश्यक आहे.
यावेळी अॅड.अनिता दिघे, सुमित वर्मा आदिंनीही हॉस्पिटलच्या सेवा कार्याचे कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात प्रकाश छल्लानी यांनी जैन सोशल फेडरेशनच्यावतीने गेल्या २३ वर्षांपासून सुरु असलेल्या विविध आरोग्यदायी उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार डॉ.आशिष भंडारी यांनी मानले. या शिबीरात १२० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
COMMENTS