अहमदनगर | नगर सह्याद्री- नगर शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी सीना नदीसह ओढ्या-नाल्यांचे सर्व्हेक्षण केले. सर्व्हेक्षणानंतर न...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
नगर शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी सीना नदीसह ओढ्या-नाल्यांचे सर्व्हेक्षण केले. सर्व्हेक्षणानंतर नदीसह ओढ्या-नाल्यांच्या हद्दी कायम करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे दगड लावले जाणार आहेत. त्यानंतर अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. सीना नदीच्या रुंदीबाबत भूमिअभिलेख विभागाकडून माहिती मिळेल. मात्र, ओढे व नाल्यांच्या रुंदीबाबत नोंद नसल्याने त्यांची हद्द निश्चित करायची कशी, असा प्रश्न आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय अपेक्षित असून, त्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी सांगितले.
नगर शहरात सीना नदीसह ओढे-नाले मिळून ४१ नैसर्गिक प्रवाहांचे मनपाद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले. शहर हद्दीतून वाहणार्या ओढ्या-नाल्यांची एकूण लांबी ८३.६३ किलोमीटर आहे. यापैकी ८.२३ किलोमीटर लांबीच्या अंतरातील ओढे-नाले सिमेंटचे पाईप टाकून भूमिगत केले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिक कृती मंचाचे प्रमुख शशिकांत चंगेडे यांनी शासनाकडे तक्रार केली. शासनाच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे व मनपा नगररचना विभागातील अधिकार्यांची बैठक घेतली. संबंधित अतिक्रमणे, पाईप टाकलेली ठिकाणे, नैसर्गिक प्रवाह बदललेल्या ठिकाणांची स्थळ पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मनपाने खासगी संस्थेद्वारे नव्याने सर्व्हेक्षण करून अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष चंगेडे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षास तक्रार केली. त्यावर मनपाने खुलासाही केला आहे.
नदी तसेच ओढे-नाले यांच्या हद्दी कायम करण्यासाठी काँक्रिट दगड लावण्याचे काम अद्याप बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मनपाद्वारे नदी, ओढे-नाले यांच्या हद्दीत येणारी अतिक्रमणे काढणे, ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह खुले करण्याचे काम सुरू केले जाणार आहे. ओढे व नाल्यांच्या रुंदीबाबत कोणत्याही नोंदी नसल्याने अतिक्रमण हटविण्यापूर्वी रुंदी निश्चित करावी लागणार आहे. त्यास धोरणात्मक निर्णय अपेक्षित असून आयुक्तांकडे तसा प्रस्ताव देणार असल्याचे चारठाणकर यांनी सांगितले.दरम्यान, सध्या मोकळ्या असलेल्या भूखंडावर पाईप टाकून ओढे-नाले बुजवलेले असतील ते काढण्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून नालेसफाई दरम्यान ही कारवाई होईल, असे चारठाणकर यांनी सांगितले.
COMMENTS