अहमदनगर | नगर सह्याद्री समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकार...
अहमदनगर | नगर सह्याद्री
समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती आदी विविध सण-उत्सव साजरे होत आहेत. सध्या सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. शहरात सामाजिक शांतता राहवी, यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न आहेत. याबाबत दोन्ही समाजाचे प्रमुख मंडळाचे प्रमुख ट्रस्टी यांची मीटिंग घेऊन आपले अधिनस्त मुलांनायाबाबत योग्य ते मार्गदर्शन करून कोणत्याही बेकायदेशीर आणि वादविवाद होऊ शकतो, अशा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप पोस्ट करू नये, स्टेटस ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुपला करा ’ओन्ली अॅडमिन’
सण-उत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मेसेज काही समाजकंटकांकडून पसरविण्यात येतात. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होते. या प्रकाराला टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपवर असलेल्या ग्रुपच्या अॅडमिनने ’ओन्ली अॅडमिन कॅन सेंड मेसेज’ ही सेटिंग करण्याचे आवाहनही कोतवाली पोलिसांनी केले आहे.
रामनवमीच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबूक आदी सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला कोणताही प्रतिसाद न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतेही बेकायदेशीर आणि वाद होऊ शकतात, असे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. शहरात जातीय तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
वाद न करता पोलिसांना कळवा
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास आपसात वाद न घालता संबंधित व्यक्तीची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी. त्यासाठी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या ७७७७९२४६०३ या क्रमांकावर टेस्ट मेसेज किंवा व्हॉट्सअॅप मेसेज करून अथवा गोपनीय विभागाचे राजेंद्र गर्गे, बाळासाहेब खामकर, उमेश शेरकर तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि जवान यांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS