सुनील चोभे | नगर सह्याद्री माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून इच्छुकांची नेते मंड...
सुनील चोभे | नगर सह्याद्री
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून इच्छुकांची नेते मंडळींच्या दारी पळापळ सुरु आहे. यंदा प्रथमच शेतकर्यांना बाजार समितीत संचालक होेण्याचा बहुमान मिळणार असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.
भाजप नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची साथ, तर नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) प्रा. शशिकांत गाडे यांना आमदार नीलेश लंके व आमदार प्राजक्त तनपुरे यांची रसद मिळणार असल्याने बाजार समिती निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. नगर तालुका बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे.
हे उतरू शकतात मैदानात
नगर बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू उपसरपंच अंकुश शेळके, राष्ट्रवादीचे नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, संदीप कर्डीले, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे, पंचायत समिती सदस्य दीपक कार्ले, संजय गिरवले, दूध संघांचे चेअरमन गोरखभाऊ काळे, सरपंच प्रवीण कोठुळे यांच्या नावाची चर्चा आहे. नुकतेच बाजार समितीच्या संचालक मंडळातून पाय उतार झालेल्यापैकी कर्डिले-कोतकर-जगताप कोणा कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शेतकर्यांची कामधेनू समजल्या जाणार्या बाजार समितीत सत्तेसाठी सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मतदान कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडून आघाडी घेतली. तालुयात कर्डिले विरोधात महाविकास आघाडी अशीच लढत होत असते. कर्डिले यांच्या विरोधात एकत्र येत बाजार समितीसाठी विरोधक यावेळी आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
माजी खासदार स्व. शेळके यांचे नातू रिंगणात!
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभरणीमध्ये माजी खासदार शेळके यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी तब्बल २० वर्ष बाजार समितीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्यानंतर शेळके कुटुंबियातील कोणीही बाजार समितीच्या रिंगणात उतरला नाही. यंदाच्या निवडणुकीत मात्र माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू खारे कर्जुने गावचे उपसरपंच अंकुश पाटील शेळके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे
बाजार समिती निवडणुकीत ’सोधा’ फॅटर चालत असल्याचे आजवरच्या निवडणुकीत दिसून आले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधकांनी वज्रमुठ बांधत निवडणुकीची आखणी सुरु आहे. कर्डिले यांच्या मदतीला खा. विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते राहतील. गाडे यांच्यासोबत माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. नीलेश लंके यांची ताकत उभी राहणार आहे. शेतकर्यांना प्रथमच बाजार समितीची निवडणूक लढविण्याची मुभा मिळाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन समतोल साधण्यात दोन्ही गटाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कोतकर यांची भूमिका महत्वाची
स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या पाठोपाठ बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे नेप्ती उपबाजार समिती उभारणीत सिंहाचा वाटा आहे. कोतकर यांनी सभापतिपदाच्या काळात बाजार समितीला शिस्त लावण्याचे काम केले. १५ वर्षे कर्डिले-कोतकर-जगताप यांनी सत्ता राखली. पाच वर्षांपासून नगरच्या राजकारणापासून कोतकर अलिप्त आहेत. असे असले तरी नगर तालुयात त्यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळे माजी सभापती भानुदास कोतकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
सोमवार दि. २७ मार्चपासून निवडणुकीची प्रक्रिया झाली. २८ एप्रिलला मतदान होणार आहे. १८ संचालकांसाठी होणार्या निवडणुकीत ३९३१ मतदार आहेत. सोसायटी मतदारसंघातून सात सर्वसाधारण सदस्य, दोन महिला सदस्य, एक मागास प्रवर्ग, एक विमुक्त जाती /भटया जातीसाठी असे अकरा सदस्य निवडले जाणार आहेत. सोसायटी मतदारसंघात १३९४ मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघासाठी दोन सर्वसाधारण सदस्य, एक अनुसूचित जाती, एक दुर्बल घटक असे चार सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघासाठी १०११ मतदार आहेत. आडते व्यापारी मतदारसंघात दोन सदस्य निवडले जाणार असून १२५३ मतदार आहेत. हमाल मापाडी मतदारसंघात २७३ मतदार असून यामधून एक सदस्य निवडून दिला जाणार आहे. एकूण १८ सदस्यांच्या निवडीसाठी सुमारे एक महिना निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहणार आहे.
कार्ले, हराळ, म्हस्के यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ
गत बाजार समितीच्या निवडणुकीत नगर तालुका महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादीचे केशव बेरड यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. यंदा बाजार समितीची सत्ता हस्तगत करण्यासाठी नगर तालुका महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, काँग्रेस नेते संपतराव म्हस्के यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र ते स्वतः रिंगणात उतरतात की कुटूंबातील व्यक्तीस उतरवतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसेच उदयोजक अजय लामखडे यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
COMMENTS