नेवासा | नगर सह्याद्री नेवासा पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील ऊर्फ अण्णा चिमाजी लष्करे यांच्या हत्याप्रकरणी औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्...
नेवासा | नगर सह्याद्री
नेवासा पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील ऊर्फ अण्णा चिमाजी लष्करे यांच्या हत्याप्रकरणी औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात आरोपी राजू जहागिरदार, मुन्ना जहागिरदार, जावेद शेख, मुन्ना पठाण, सर्फराज सईदने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाच्या न्या. आर. एम. जोशी व न्या. आर. जी. अवचट यांनी फेटाळत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील मुश्ताक शेखची निर्दोष मुक्तता केली आहे.
१८ मे २०११ रोजी नेवासा येथील अण्णा लष्करे, त्याची पत्नी पुजा व त्याची तीन मुले व शेजारील मुलगा हे चारचाकी गाडीमध्ये औरंगाबादला जात असताना नगर नायाजवळ त्यांच्या गाडीला दुसर्या एका गाडीने धडक देऊन १०० ते १५० मीटर फरफटत नेले. यावेळी अण्णा लष्करे यांची दुसर्या ड्रायव्हर बरोबर बाचाबाची झाली. त्याचवेळी दोन मोटारसायकलवर चार ते पाच जण तेथे आले. त्यापैकी दोघांनी लष्करे यास धरले व इतरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत अण्णा लष्करे जखमी होऊन खाली पडल्यानंतर पुजा हिने वाटसरूंच्या मदतीने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. डॉटरांनी अण्णा लष्करे मयत झाल्याचे घोषित केले. पुजा लष्करे यांनी छावणी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती.
गुन्ह्यातील आरोपी राजू जहागिरदार, मुनिर पठाण, मुन्ना जहागिरदार, जावेद शेख, मुस्ताक शेख, आलताब बेग व सर्फराज सय्यद विरुद्ध पुरावा आल्याने जन्मठेप व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. या निकालाविरुध्द राजू जहागिरदार, मुन्ना पठाण, मुन्ना जहागिरदार, जावेद शेख (पेंटर), सर्फराज सय्यद व मुश्ताक शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यात मुश्ताक शेख याचे अपील मान्य करून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. बाकी आरोपींचे अपील फेटाळत औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. सरकारच्या वतीने अॅड. पी. जी. बोराडे व अॅड. सुनील चावरे यांनी काम पाहिले.
COMMENTS