गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराचे वितरण अहमदनगर | नगर सह्याद्री शिक्षकाचा चेहरा नेहमी आशावादी असावा. शिक्षक वर्गात प्रवेश करतो तेव्हा चैतन्य व उ...
गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराचे वितरण
अहमदनगर | नगर सह्याद्री
शिक्षकाचा चेहरा नेहमी आशावादी असावा. शिक्षक वर्गात प्रवेश करतो तेव्हा चैतन्य व उत्साहाचा झरा वर्गात आला असे विद्यार्थ्यांना वाटले पाहिजे असे प्रतिपादन पाणी फौंडेशनचे सदस्य, प्रख्यात व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी केले.
गुरुकुल महिला आघाडीने जाहीर केलेल्या गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मनगाव प्रकल्पाचे संस्थापक डॉ.सुचेता धामणे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, डॉ.राजेंद्र धामणे, गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर-इंगळे, सुनिता काटकर, जयश्री घोडेकर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, शिक्षिकेंना यशोदेबरोबरच देवकी होण्याचीही संधी असते. कारण त्या स्वतःच्या मुलाबरोबर वर्गातील अनेक मुलांचा सांभाळ करतात. शेकडो मुलांच्या आतील क्षमता समृद्ध करण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. मुलांना समृद्ध करताना स्वतः शिक्षकही समृद्ध होत जातात. शिक्षकांनी आई आणि बापाचे अंत:करण ठेवले पाहिजे. मुलांना शिक्षकांमध्ये बापाचा धाक आणि आईची हाक जाणवली पाहिजे. शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत तर घराचे प्रांगण शाळेपर्यंत असावे. तरच मुले शिक्षकांशी समरस होतील. जगात विद्येचे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ते देण्याचे भाग्य शिक्षकांना मिळते याची जाणीव सदैव ठेवणारा शिक्षक सदृढ समाज घडवू शकतो.
शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले, सगळ्या रिती भाती संभाळते ती नारी. गुरुकुल मंडळाने दिलेले नारीशक्ती पुरस्कार शिक्षिकेंना प्रेरणादायी ठरतील. डॉ.धामणे यांनी मनगाव स्थापनेमागील भूमिका विषद केली. शिक्षिकेंनी मनगावला भेट द्यावी. त्यामुळे आम्ही सांभाळ करत असलेल्या मन हरवलेल्या स्रियांना दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळेस डॉ. संजय कळमकर, जयश्री झरेकर, स्वाती गोरे, राजश्री सोंडकर यांचेही भाषणे झाली. स्वागत सुनिता काटकर, आभार सुदर्शन शिंदे, सूत्रसंचालन भाऊ नगरे व प्रियंका शेळके यांनी केले.
COMMENTS