अहमदनगर | नगर सह्याद्री- लॅब टेस्टसाठी लागणारे पैसे फोन पे वर घेण्याच्या नादात एका लॅब व्यवसायिकाची ९८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. महे...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
लॅब टेस्टसाठी लागणारे पैसे फोन पे वर घेण्याच्या नादात एका लॅब व्यवसायिकाची ९८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. महेश दत्तात्रय तुंगार (वय ४४ रा. हनुमान नगर, दौंड रोड, नगर) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी यांची कायनेटिक चौकात गजानन नावाची लॅब आहे. बुधवारी (दि. २३) सकाळी त्यांच्या मोबाईलवर डॉ. कांचन मोहिते यांनी एका व्यक्तीचा नंबर पाठविला होता. त्या नंबरवर फिर्यादी यांनी संपर्क केला असता समोरचा व्यक्ती म्हणाला, मी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड येथून बोलत असून आमच्या ५० लोकांच्या रक्ताच्या व लघवीच्या रूटीन टेस्ट करावयाच्या आहेत.
आम्हाला किती खर्च येईल ते सांगा.’ फिर्यादी यांनी एकुण ८२ हजार ५०० रूपये खर्च येईल, असे सांगितले. तुम्ही मला व्हिडीओ कॉल करा व मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मोबाईलवर प्रक्रिया करा तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील असेही त्या व्यक्तीने सांगितले. फिर्यादी यांनी त्याला व्हिडीओ कॉल केला असता व्यक्तीने त्यांना गुगल पे ओपन करण्यास सांगून पे बीलमध्ये जात एचडीएफसी बँक क्रेडीट कार्डवर लीक करून ४९ हजार रक्कम टाकुन अकाऊंट लिंक करा असे सांगितले.
फिर्यादी यांनी तसे केले असता काही वेळात त्यांच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून ९८ हजार रूपये कट झाल्याचे मेसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS