सात संचालकांच्या अपात्रतेवर केंद्रीय निबंधकांकडे सुनावणी अर्बन बँक ः 4 मार्चला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस अहमदनगर । नगर सह्याद्री- नगर अर्बन...
सात संचालकांच्या अपात्रतेवर केंद्रीय निबंधकांकडे सुनावणी
अर्बन बँक ः 4 मार्चला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस
अहमदनगर । नगर सह्याद्री-
नगर अर्बन बँकेच्या 2014 ते 2019 या काळातील संचालक मंडळाच्या अपात्रतेबद्दल केंद्रीय सहकार निबंधकांना उच्च न्यायालयाने निर्णय घेण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवून अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने केंद्रीय सहकार निबंधक जागे झाले आहे. आता त्यांनी येत्या 4 मार्चला सकाळी 11 वाजता दिल्लीत केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयात याप्रकरणी सुनावणी ठेवली आहे. नगर अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह संचालक मंडळातील सात सदस्य तसेच माजी संचालकांना या दिवशी उपस्थित राहून म्हणणे मांडावे लागणार आहे.
बँकेच्या 2014 ते 2019 मधील संचालक मंडळाला रिझर्व्ह बँकेने बरखास्त केल्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. तसेच केंद्रीय सहकार निबंधकांना संबंधित संचालक मंडळावर अपात्रतेची कारवाई करण्याची सूचना केली होती. रिझर्व्ह बँकेने 15 सप्टेंबर 2020 च्या पत्राद्वारे नगर अर्बन बँकेच्या संचालकांना अपात्र ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस सहकार निबंधक कार्यालयाला करून एक महिन्यात ही कारवाई होणे अपेक्षित होते
अजूनपर्यंत अशी कारवाई झाली नसल्याने बँकेचे ज्येष्ठ सभासद विधिज्ञ अच्युत पिंगळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन केंद्रीय सहकार निबंधकांना म्हणणे मांडण्याची नोेटीस बजावली होती. मात्र, त्यास त्यांनी टाळाटाळ केल्याने अखेर खंडपीठाने त्यांना अडीच हजार रुपयांचा दंड केला. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सहकार निबंधकांनी तातडीने बँकेच्या आजी-माजी संचालकांना नोटीस पाठवून येत्या 4 मार्चला सकाळी 11 वाजता म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
COMMENTS