रामायण महानाट्याने डोळ्यांचे पारणे फेडले; विविध सामाजिक संस्थाना सहा कोटींच्या देणग्या संगमनेर | नगर सह्याद्री आपल्या अधिकारांसाठी आपण रोजच ...
रामायण महानाट्याने डोळ्यांचे पारणे फेडले; विविध सामाजिक संस्थाना सहा कोटींच्या देणग्या
आपल्या अधिकारांसाठी आपण रोजच संघर्ष करतो, मात्र जेव्हा इतरांच्या अधिकारांची रक्षा हे आपल्याला कर्तव्य वाटू लागते त्यावेळी आपण विजयाच्या मार्गावर अग्रेसर होतो. मालपाणी परिवारात सामाजिक बांधिलकी व अनेक सद्गुणांचे दर्शन पदोपदी होते. या परिवाराचे नेतृत्व करणारे राजेश मालपाणी स्वाध्यायशील उद्योगपती आहेत. त्यांच्या सानिध्यातून आपलीही दृष्टी अधिक व्यापक बनली आहे. अशाप्रकारचे अनमोल रत्न लाभणे ही संगमनेर व परिसरासाठी परमेश्वराची मोठी देणगीच असल्याचे गौरोवोद्गार राष्ट्रसंत, श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी सोमवारी काढले.
उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त जाणताराजा मैदानावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोमवारी रामायण’ या महानाट्यांच्या सादरीकरणाने समारोप झाला. यावेळी आशीर्वचन प्रदान करतांना स्वामीजी बोलत होते. श्रीमती सुमनताई, ललितादेवी व सुवर्णा मालपाणींसह राजेश व संगिता मालपाणी यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी स्वामीजींनी उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या जीवनचरित्रावर भाष्य करतांना त्यांची विविध गुणवैशिष्ट्ये उपस्थितांसमोर विशद केली. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात मोठ्या पगाराची नोकरी मिळत असतांनाही त्यांनी जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ या तत्त्वानुसार मायभूमीकडे धाव घेतली. मातृभूमीच्या सेवेत आपला समर्पित भाव कसा असावा, कशाप्रकारे मायभूमीची सेवा करावी हे अनुभवायचे असेल तर मालपाणी परिवाराकडे बघावं. तन-मनं आणि धनाने या परिवाराने संगमनेर व परिसराची सेवा केल्याचे त्यांनी सांगितले.
१७ फेब्रुवारीपासून जाणताराजा मैदानावर सुरु असलेल्या या अभीष्टचिंतन सोहळ्याचा सोमवारी समारोप झाला. यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तिनशे विद्यार्थ्यांनी रामायण’ हे महानाट्य सादर केले. या महानाट्यात सहभागी झालेल्या प्रत्येक पात्राने वठवलेली भूमिका, प्रत्येक भूमिकेला साजेशी वेशभूषा, नेमके संवाद, प्रकाशयोजना, पार्श्वसंगित आणि नेपथ्य यातून साकारलेले श्रीराम जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे विविध प्रसंग उपस्थित रसिकांना रामराज्याची अनुभूती देवून गेले. रामकथेतील प्रत्येक प्रसंगानुरुप सादर झालेल्या एकाहून एक सरस नृत्याविष्कारांनी या महानाट्याने संगमनेरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
मालपाणी परिवाराचे दातृत्त्व..
उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या एकसष्टीचे औचित्य साधून मालपाणी परिवाराने आपल्या दातृत्त्वशीलतेचा पुन्हा एकदा परिचय दिला. यावेळी संगमनेर-अकोले तालुयाची शिक्षणगंगा म्हणून ओळखल्या जाणार्या शिक्षण प्रसारक संस्थेत व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण सुरु करण्यासाठी दिड कोटी, आळंदी येथील वेदश्री तपोवन या संस्थेला १ कोटी, मालपाणी उद्योग समुहाचा विस्तार असलेल्या वेगवेगळ्या ११ ठिकाणच्या शाळांसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एकूण २ कोटी ७५ लाख, रोटरी नेत्र रुग्णालयाच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी २५ लाख व श्रीमद् भगवद्गीतेच्या प्रचार व प्रसारासाठी गीता परिवाराला ६० लाख अशी एकूण ६ कोटी ११ लाख रुपयांची देणगीही यावेळी जाहीर करण्यात आली.
COMMENTS