महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कामाचे भूमिपूजन अहमदनगर | नगर सह्याद्री राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ठोस ...
महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कामाचे भूमिपूजन
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीसीच्या निधीतून तीन टक्के निधी उपलब्ध केल्याचे सांगितले असले, तरी सदरचा निधी हा गड-किल्ल्यांसह इतर स्मारकांसाठीही आहे. त्यामुळे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी हा निधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
नगर महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन शिवजयंतीदिनी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात व मंत्रोच्चारात हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी फटायांची आतषबाजी करण्यात आली. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीना चोपडा, आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींसह मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. चार वर्षांपूर्वी नगर महापालिकेच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी महापालिकेतील कार्यक्रमात भूमिपूजन करण्यात आले. ६० ते ७० लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणार्या पुतळ्याचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे, कोणत्या पक्षाला कोणते नाव, कोणते चिन्ह मिळाले याच्याशी सर्वसामान्यांना देणे घेणे नाही. मागील अडीच वर्षे सरकार अस्थिर होते, आता तुमचे सरकार आले आहे. मागील प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. महापौर शेंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर व त्यांच्या रयतेसाठीच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढीला मिळत रहावे, यासाठी मनपा आवारात पुतळा बसविण्यात येत आहे. भोसले यांनी प्रास्ताविक केले.
स्मारकाचा निधी रखडला
चौथे शिवाजी महाराज व नगर यांचा जवळचा संबंध आहे. नगरच्या किल्ल्यात एक कैद होते. नगर येथेच त्यांची समाधीही आहे. खासदार असताना या स्मारकाच्या कामासाठी ३४ लाख रुपयांचा निधी मी दिला होता. आता मी खासदार नाही. या कामाची वर्क ऑर्डर ही निघाली आहे. मात्र, अद्याप निधी रिलीज झालेला नाही. याबाबत खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा करावा. त्यांचे सरकार असल्याने त्यांनी यात लक्ष घालून निधीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना त्यांनी केली.
COMMENTS