पहिल्याच फेरीत कोटा ओलांडत मिळविली 68 हजार 999 मते ः ‘मविआ’ची धुळधाण नाशिक । नगर सह्याद्री - विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघा...
पहिल्याच फेरीत कोटा ओलांडत मिळविली 68 हजार 999 मते ः ‘मविआ’ची धुळधाण
नाशिक । नगर सह्याद्री -
विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक 68 हजार 999 मते मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी घोषित केले.
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी पार पडली. त्यात दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघ होते. या सर्वात नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक राज्यभर गाजली. काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न दाखल करणे, त्याऐवजी त्यांच्या चिरंजीवांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणे, त्यांच्या विरोधात भाजपने उमेदवार न देणे,
या घडामोडींमुळे काँग्रेसने प्रथम डॉ. तांबे आणि नंतर सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करणे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे कुटुंबासोबतच ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निवडणूक काळात सातत्याने संताप व्यक्त करणे या सर्व बाबींमुळे ही निवडणूक चर्चेत राहिली. काँग्रेसचे असूनही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सत्यजित तांबे यांना भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा देणे आणि भाजपच्या असूनही मविआकडून शुभांगी पाटील पुरस्कृत होणे, यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विभागीय आयुक्त गमे यांनी पहिल्या पसंतीच्या 1 लाख 29 हजार 615 मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर निकालाबाबत माहिती दिली. विजयी उमेदवारासाठी 58 हजार 310 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा 10 हजार 689 मते अधिक प्राप्त केली. त्यांना 68 हजार 999 मते प्राप्त झाली. एकूण मतमोजणीनंतर 1 लाख 16 हजार 618 मते वैध ठरली तर 12 हजार 997 मते अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविला. आयोगाच्या परवानगीने गमे यांनी सत्यजित तांबे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले करत विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.
इतर उमेदवारांना मिळालेली मते...
शुभांगी भास्कर पाटील (39,534), रतन कचरु बनसोडे (2645), सुरेश भिमराव पवार (920), अनिल शांताराम तेजा (96), अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर (246), अविनाश महादू माळी (1845), इरफान मो. इसहाक (75), ईश्वर उखा पाटील (222), बाळासाहेब रामनाथ घोरपडे (710), अॅड. जुबेर नासिर शेख (366), अॅड. सुभाष राजाराम जंगले (271), नितीन नारायण सरोदे (267), पोपट सीताराम बनकर (84), सुभाष निवृत्ती चिंधे (151), संजय एकनाथ माळी (187).
सत्यजित तांबे शनिवारी भूमिका स्पष्ट करणार
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये शुभांगी पाटील यांचा पराभव केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सत्यजित तांबे यांनी येत्या 4 फेब्रुवारी रोजी अर्थात शनिवारी पुढील वाटचालीबाबत भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक राजकीय मुद्द्यांवर यावेळी आपण सविस्तर बोलू, असंही ते म्हणाले. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणता पर्याय सत्यजित तांबे निवडणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सत्यजीत तांबेंना अपक्ष राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सत्यजीत तांबेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांचा सत्यजित तांबेंना सल्ला
पुणे ः इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार. सत्यजीतला पुढे त्याचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचं आहे. या सगळ्याचा विचार करून सत्यजीत तांबे यांनी निर्णय घ्यावा, असा सल्ला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे. त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे मधल्या दीड महिन्यात काय झालं हे त्यानं जास्त मनाला लावून घेऊ नये. त्यानं काँग्रोसच्याबरोबर जावं, बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे हे घरातले मोठे नेते आहेत. ते सांगतील ते त्यानं ऐकावं. याउपर काय करायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
COMMENTS