अहमदनगर । नगर सह्याद्री- स्थायी समितीच्या रिक्त जागांवर सदस्य निवडीसाठी शुक्रवारी झालेल्या सभेत नऊ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. सदस्य...
अहमदनगर । नगर सह्याद्री-
स्थायी समितीच्या रिक्त जागांवर सदस्य निवडीसाठी शुक्रवारी झालेल्या सभेत नऊ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. सदस्य निवडीनंतर सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी नगरसचिव एस. बी. तडवी यांनी दिली.
महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्य एक फेब्रुवारीला निवृत्त झाले होते. या रिक्त जागांवर नवीन सदस्य निवडीसाठी शुक्रवारी विशेष महासभा बोलाविण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच विद्यमान सभापती कुमारसिंह वाकळे यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आणखी एक जागा रिक्त झाली. या रिक्त जागांवर सुवर्णा गेनाप्पा, सुनीता कोतकर, कमल सप्रे (शिवसेना), संपत बारस्कर, नजीर शेख, सुनील त्रिंबके (राष्ट्रवादी), प्रदीप परदेशी, पल्लवी जाधव (भाजप), मुदस्सर शेख (बसपा) यांची नियुक्ती करण्यात आली.
आता सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. मनपाच्या प्रस्तावनंतर विभागीय आयुक्तांकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येईल. सभापतिपदासाठी शिवसेनेकडून गणेश कवडे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सभागृह नेता पद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विनीत पाऊलबुधे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
COMMENTS