मुंबई / नगर सहयाद्री - शिवसेनेतील कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्य...
मुंबई / नगर सहयाद्री -
शिवसेनेतील कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच सुपारी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर यांना देण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर आता राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी पोलिस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राजा ठाकूर यांचा गुंड असा उल्लेख संजय राऊत यांनी केला. राऊत यांच्या या विधानाची दखल घेऊन त्याचा तपास करावा. तसेच राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पूजा ठाकूर यांनी पोलिसांकडे केली आहे.संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.
पूजा ठाकूर म्हणाल्या, मी या आधी शिवसेनेकडून निवडणूक लढले आहे. तेव्हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यांनी मला उमेदवारी दिली होती. आता मी शिंदे गटात आहे, असे त्यांना वाटत आहे. माझे पती समाजसेवक म्हणून चालत होते. आत त्यांना ते गुंड दिसत आहेत. मी अजूनही शिवसेनेत आहे. माझे पती मला समाजकार्यात मदत करत असतात. हीच आमची ओळख आहे.
माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांनी प्रुफ आणावा मग बोलावे. कलम 211, 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या गोष्टीचा पाठपुरावा करत राहून न्यायाची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे पूजा ठाकूर यांनी म्हटले.
COMMENTS