मुंबई / नगर सहयाद्री - फडणवीसांची सत्ता गेली, ठाकरेंची आली...शिवसेनेत मोठं बंड झालं... ठाकरेंची सत्ता गेली, पुन्हा फडणवीस सत्तेवर आले. ठाकर...
मुंबई / नगर सहयाद्री -
फडणवीसांची सत्ता गेली, ठाकरेंची आली...शिवसेनेत मोठं बंड झालं... ठाकरेंची सत्ता गेली, पुन्हा फडणवीस सत्तेवर आले. ठाकरे विरुद्ध फडणवीस हा सामना चांगलाच गाजला. मात्र, लवकरच या सामन्याला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्याशी शत्रुत्व नाही वैयक्तीक मतभेद आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी दोस्तीचा हात पुढं केल्यानंतर फडणवीसही मागे राहिले नाहीत. उद्धव आणि आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत, असं फडणवीसांनी स्पष्ट करून टाकले.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांबाबत मोठे विधान केले होते. आमच्यात राजकीय विरोध असू शकतो पण आम्ही अजूनही त्यांना मित्र मानतो, तुम्ही त्यांना विचारा ते आम्हाला काय समजतात? असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रश्नाच्या उत्तरात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजिबात नाही. महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. अलिकडच्या काळात एक शत्रूत्त्वाची भावना पहायला मिळते. पण, ती आपल्याला संपवावी लागेल. उद्धवजी आणि आदित्य यांनी वेगळा राजकीय मार्ग पत्करला, आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही शत्रू नाही, तर वैचारिक विरोधक आहोत, असे फडणवीस म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात सूडाचं राजकारण सुरू आहे. राजकीय पक्षांमध्ये अक्षरशः पोलिटिकल गँगवॉर सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे. अशा वेळी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जुळू लागलेले हे नवे सूर आशादायी म्हणावे लागतील. याच संघर्षातून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. मात्र, लवकरच ही दुश्मनी संपली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. 'जानी दुश्मन' पुन्हा जिगरी दोस्त बनणार? सूडाच्या राजकारणानंतर सद्बुध्दीचा अध्याय महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळणार आहे.आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे हा राजकीय वाद संपमार अशी चर्चा रंगली आहे.
COMMENTS