अहमदनगर । नगर सह्याद्री- पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचार्यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आह...
अहमदनगर । नगर सह्याद्री-
पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचार्यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहणारा अधिकारी या पतसंस्थेत पदसिद्ध अध्यक्ष तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून काम पाहत असतात. मात्र, या दोघांनाही पतसंस्थेच्या थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.
असे असतानाही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणपत नान्नोर हे अधिकाराचा गैरवापर करत या निवडणुकीत सभासदांना त्रास देत असून त्यांचा मानसिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत संस्थेच्या काही सभासदांनी नान्नोर यांची थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. नान्नोर यांना हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संस्थेची स्थापना 1946 मध्ये झाली. तेव्हापासून या संस्थेत पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष ही पदे आहेत. मात्र, दोन्ही विभागाचे कार्यकारी अभियंता या संस्थेत थेट राजकीय हस्तक्षेप करत नाहीत. कर्मचार्यांनी लोकशाहीच्या मार्गाने म्हणजेच निवडणुकीतून अथवा बिनविरोध प्रक्रियेतून संचालक मंडळ निवडले जाते आणि त्यांच्यातून चेअरमन- व्हाईस चेअरमनची निवड केली जाते. द्यमान संचालक मंडळाने गेल्या सात वर्षात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असून याबाबत सभासदांनी सहकार विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या.
या तक्रारींची चौकशीही झाली. आता निवडणुक प्रक्रिया सुरू असताना विद्यमान संचालक मंडळातील काहींनी आपली सत्ता जाणार असल्याचे ओळखून थेट कार्यकारी अभियंता नान्नोर यांना हाताशी धरून सभासद कर्मचार्यांना दमदाटी करण्यास प्रारंभ केला असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून नान्नोर हे विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात भूमिका घेणार्या कर्मचार्याला कार्यालयात बोलावून दमदाटी करू लागले आहेत.
पदसिद्ध अध्यक्ष असले तरी त्यांनी अशाप्रकारे कर्मचार्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. यापूर्वी असे काम कोणत्याही कार्यकारी अभियंत्याने केले नाही. मात्र, नान्नोर हे त्यांच्या पदाचा गैरवापर करत असून कर्मचार्यांशी सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभाग सोसायटीच्या सभासदांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
COMMENTS