कामगारांवर बेरोजगारीची कुर्हाड; औद्योगिक वसाहतीत नेमके घडतंय काय? शरद रसाळ । नगर सह्याद्री- पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये मो...
शरद रसाळ । नगर सह्याद्री-
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असतानाही अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत; तर काही कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. सुपा औद्योगिक वसाहतीमधील उमा प्रेसिडेंट, श्री जी, मास्क फासनर, संजीवनी, क्लास पॉलीमर, राजदीप, पुल पॅनल अशा नामांकित कंपन्या स्थलांतरित झाल्या असतानाच आता औद्योगिक वसाहतीतील औषध निर्मीतीमध्ये अग्रेसर असणारी ओमिनी अॅक्टिव्हचेही स्थलांतर झाल्याने हजारो कामगारांच्या हाताचे काम जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सुपा एमआयडीसीमध्ये हव्या असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने व कामाचा ठेका घेण्यावरून अनेक वेळा वाद झाले आहेत. याचा थेट कंपनी व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याने जुनी वसाहत व नवीन वसाहतीतील कंपन्या बंद झाल्या आहेत. एका मागून एक कंपनी स्थलांतरीत होत असताना काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येतो. दुर्लक्ष केल्यामुळेच औषध निर्मीती करणारी कंपनी स्थलांतरित होत आहे. यामुळे 100 कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. या गोष्टीचे गांभिर्य लक्षात घेऊन कामगार आयुक्त नितीन कवले, एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी हेमांगी पाटील, नितीन गवळी यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असताना कंपन्या स्थलांतरीत होणे, बंद पडणे त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार होणे, हे पटण्यासारखे नाही. प्रशासनाने 107 कामगारांच्या पूनर्वसनाची जबाबदारी घेऊन निपक्ष चौकशी करावी.
-अविनाश पवार, मनसे नेते.
100 कामगारांच्या पूनर्वसनाची जबाबदारी घेऊन उद्योग टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना अद्याप तसे प्रयत्न दिसून येत नाहीत. औद्योगिक वसाहतीतील छोट्या उद्योगांना कोणाचा त्रास होतो का, याचीही माहिती घेण्याची गरज आहे. या अगोदर बरेच उद्योग स्थलांतरित अथवा बंद झाले आहेत. औद्योगिक वसाहतीत उद्योजकांवर कोणाचा असेल तर व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस व महसूल प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच नेमका प्रकार काय आहे, तो जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.
COMMENTS