सुनील चोभे । नगर सह्याद्री ओबीसी आरक्षण, जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांचा घोळ न्यायप्रविष्ठ असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या न...
सुनील चोभे । नगर सह्याद्री
ओबीसी आरक्षण, जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांचा घोळ न्यायप्रविष्ठ असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका कधी? असा सवाल निवडणूक इच्छुकांकडून केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर वर्षभरापासून प्रशासक असल्यामुळे विकासकामे ठप्प झाल्याचा सूर पुढारी, सदस्यांमधून निघू लागला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी गट-गणांचे आरक्षण जाहीर होवून भावी कारभार्यांनी मैदान पिंजून काढायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकार कोसळले अन जिल्हा परिषद, पंचायत समितीची गट-गण रचना व आरक्षण न्यायालयात पोहोचले. यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नव्याने गट-गण रचना होणार की पूर्वीची गट-गण रचना वापरली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत संपून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. ओबीसी आरक्षण, गट-गणांचा अंतिम निर्णय न झाल्याने अजूनही तीन-चार महिन्याचा कालावधी उलटला जावू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे
एप्रिलमध्ये बाजार समित्या निवडणुकींची रणधुमाळी
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या संचालक मंडळांचा कार्यकाळ संपला असून बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती आहे. काही बाजार समितीत्यांवर प्रशासकाची नियुक्ती होवून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. न्यायालयाने 30 एप्रिलपूर्वी बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून बाजार समित्यांच्या मतदार यादीचा प्रोग्राम जाहीर करण्यात आला आहे. 20 मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या मतदार यादीमध्ये अलीकडच्या काळात ग्रामपंचायत व सोसायटींच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार 30 एप्रिलपूर्वी बाजार समित्यांच्या निवडणुका घ्यावयाच्या असल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये बाजार समित्या निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे.
COMMENTS