‘जलजीवन’च्या काम वाटप प्रकरणी आमदार लहू कानडेंचा तारांकित प्रश्न! । वाळुंज ठेकेदार रडारवर शरद झावरे । नगर सह्याद्री अहमदनगर जिल्हा परिषदेमध्...
‘जलजीवन’च्या काम वाटप प्रकरणी आमदार लहू कानडेंचा तारांकित प्रश्न! । वाळुंज ठेकेदार रडारवर
शरद झावरे । नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशनच्या काम वाटपात पारनेर तालुक्यातील वाळुंज नावाच्या ठेकेदारांच्या पदरात अधिकार्यांनी सर्वात जास्त कामे टाकली असून या जलजीवन मिशन पाणी योजनेची चौकशी सुरू झाली आहे. श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी जलजीवन मिशनच्या काम वाटपप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरची जलजीवन योजना गाजण्याची चिन्हे आहेत. वाळुंज ठेकेदाराचा पाठीराखा कोण? कुणाच्या आशीर्वादाने एवढी मोठी कामे मिळाली? याबाबत अनेक तर्कवितर्क जिल्हा परिषदेमध्ये केले जात आहेत. शासनाचे डॉ. रविंद्र भराटे यांनी जलजीवनच्या चौकशीबाबत 17 फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठविले आहे.
जलजीवन मिशन योजनेतील निविदा घोटाळे, ठेकेदारांचे खोटे प्रतिज्ञापत्र, अधिकार्यांकडून त्यांना दिले जाणारे अभय, यावरून तक्रारी सुरू असताना आता अधिवेशनातही नगरची जलजीवन योजना गाजणार आहे. उत्तर जिल्ह्यातील एका आमदाराने ’जलजीवन’च्या निविदा प्रक्रिया राबविताना काम वाटपात अपहार झाल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने खळबळ उडाली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 829 योजना घेण्यात आल्या. त्यासाठी 1300 कोटीपेक्षा अधिक तरतूद आहे. मात्र, योजनेच्या कामांवरून तक्रारी सुरू आहेत. यापूर्वीही अधिकार्यांनी निविदांमध्ये गोंधळ घातल्याचे आरोप झाले आहेत. त्यावरून आंदोलन, उपोषण झाली. गत आठवड्यातच खासदार सदाशिव लोखंडे यांनीही ’जलजीवन’वरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना सुनावले. त्यानंतर हे प्रकरण थेट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांपर्यंत पोहचले. त्यामुळे नगरचा जलजीवन विषय वादळी ठरत आहे. आता जलजीवनच्या या गोंधळात उत्तरेतील महाविकास आघाडीच्या आमदारांनी लक्ष घातले आहे. त्यांनी नगर जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रिया राबविताना काम वाटपात अपहार केल्याबाबत थेट तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. तोंडावर आलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न गाजणार आहे. यात, जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा विभागाने काम वाटपात अनियमितता केल्याचे दि. 18 जानेवारी रोजी निदर्शनास आले असून, हे खरे आहे का, तसेच ते खरे असल्यास याप्रकरणी शासनाने चौकशी केली का, चौकशीमध्ये काय आढळले, काम वाटपात अनियमितता करणार्यांवर कोणती कारवाई केली, कोणती कारवाई करण्यात येत आहे, जर नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
अनियमिताबाबत मागविला अहवाल..
महाराष्ट्र शासनाच्या कार्यसन अधिकारी रवींद्र भराटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना 18 जानेवारी 2023 रोजी जनजीवन मिशनची कामवाटप करताना मोठ्या प्रकारे अनियमितता झाली असल्याची लिखित तक्रार करण्यात आली आहे्. या संदर्भात पत्र काढून संबंधित तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने भागनिहाय उत्तर पूरक टिपण्णीसह तसेच उत्तरात नमूद बाबींच्या कागदपत्रांसह, निवेदनासह पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रिया राबविताना काम वाटपात अपहार केल्याबाबत, चौकशी अहवालासह माहिती तातडीने पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
COMMENTS