मुंबई / वृत्तसंस्था- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला...
मुंबई / वृत्तसंस्था-
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर पक्षात फुट पडल्यानंतर चिन्हाचे प्रकरण आयोगाकडे पाठवणं अयोग्य असल्याचा युक्तिवाद करत राज्यपाल यांचे राजकारणचं कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर मांडलं आहे.
अॅड. कपिल सिब्बल यांनी आज घटनापीठासमोर 10 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर घटनापीठ ऐतिहासिक निर्णय देण्याची शक्यता आहे.आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही हे प्रकरण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक मोठे उदाहरण ठरेल, असे भाकीत केले आहे.
1) अॅड. कपिल सिब्बल यांनी विचारले की, पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे काय असू शकतात? पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार वेगळा निर्णय घेऊ शकतात का?
2) आम्ही नेतृत्वावर विश्वास ठेवत नाही, असे एखाद्या पक्षातून फुटलेला गट म्हणू शकतो का?
3) पक्षाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई ठाकरेंनी सुरू केली होती. अपात्रतेची ही कारवाई प्रलंबित असताना राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण कसे काय दिले? राज्यपालांची ही कृती नियमबाह्य नव्हती का?. त्यामुळे राज्यपालांच्या अधिकारांचीही तपासणी व्हावी. संविधानाचे संरक्षण हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. मात्र, अलिकडच्या काळात राज्यपालही राजकारण करत आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातही राज्यपालांनी राजकारण केले, ही दुर्दैवी बाब आहे.
4) विधानसभा अध्यक्ष एखाद्या आमदाराला अपात्र ठरवत असेल तर न्यायालय त्या निर्णयात हस्तक्षेप करू शकतो का? न्यायालय विधानसभा अध्यक्षांचे निर्णय रद्दबातल करू शकते का? विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय?
5) एखाद्या पक्षात फुटीमुळे दोन गट निर्माण झाले आहेत. तर, पक्षचिन्ह कोणत्या गटाकडे जाईल? निवडणूक आयोगाची या प्रकरणी भूमिका काय?
6) विधिमंडळ पक्षनेता, प्रतोद यांची निवड करण्याबाबत विधिमंडळ अध्यक्षांचे अधिकार काय? बहुमताने पक्षनेता, प्रतोद बदलतो येतो का?
7) पक्षांतर्गत वादाची समीक्षा कोर्टाकडून केली जाऊ शकते का?
8) पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानेच आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. बहुमत असले तरी आमदार आसाममध्ये बसून पक्षनेता कसा काय ठरवू शकतात?
9) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड चुकीची आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले असते तर राहुल नार्वेकर यांची निवडच झाली नसती. बहुमत चाचणीत नार्वेकर यांचा पराभव झाला असता.
10) पक्षचिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाशी नाते तोडायचे आणि पुन्हा त्याच पक्षावर दावा करणे नियमात बसते का?
अॅड. कपिल सिब्बल यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, आपल्याला प्रश्न अचूक करावे लागणार आहेत. प्रश्नांची संख्या आणखी कमी करावी लागेल. काही मोजक्याच मुद्द्यांवर मुद्देसुद युक्तिवाद करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला असे प्रश्न निश्चित करावे लागणार आहेत.
COMMENTS