मुंबई । नगर सह्याद्री - बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आल्याचे दि...
मुंबई । नगर सह्याद्री -
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आल्याचे दिसत आहे. नाना पटोले यांच्या सोबतच्या वादातून आज बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आजच बाळासाहेब थोरात यांचा जन्मदिवस आहे.
यावर आज पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक भाष्य केले. नाना पटोले म्हणाले, गेल्या काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. थोरात यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, काँग्रेस हायकमांडचे पक्षातील गटबाजीवर लक्ष आहे. माझ्याविरोधात चालू असलेल्या राजकारणावर मी लक्ष देत नाही. माझ्यासमोर, राज्यासमोर इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते. काही लोक वर्ष वर्ष घेत नव्हते. आमची मागील महिन्यातच नागपूरमध्ये प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली होती. आता पुन्हा 15 फेब्रुवारीला अशीच एक बैठक होणार आहे. त्यात पोटनिवडणुकींची रणनीती बनवणे, आत्ताच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात विजयी आमदारांचा सत्कार आणि राहुल गांधींबरोबर कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असे चाललेले यात्रींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच 15 फेब्रुवारीच्या बैठकीत पक्षातील घडामोडींवरही चर्चा केली जाईल. आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. माध्यम काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे थोरात यांच्या राजीनाम्याविषयी म्हणाले, विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे सोपवला जातो. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याविषयी आम्हाला तरी अद्याप काहीही माहिती नाही.
पटोलेंसोबत काम करणे अशक्य
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्याने बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले आमने-सामने आले आहेत. थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा व ‘राजकीय गॉडफादर’ समजले जातात. त्यांना उमेदवारी नाकारल्याने थोरात यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करुन थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते. पत्रात थोरात यांनी पटोले यांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे या पत्रात बाळासाहेब थोरातांनी म्हटले असल्याचे सांगितले जाते.
COMMENTS