नवी दिल्ली । नगर सह्याद्री - दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी) महापौरपदाच्या निवडणुकीनंतर बुधवारी सायंकाळी स्थायी समितीच्या निवडणुकीला सुरुवा...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी) महापौरपदाच्या निवडणुकीनंतर बुधवारी सायंकाळी स्थायी समितीच्या निवडणुकीला सुरुवात होताच सभागृहात आप आणि भाजप सदस्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये पुरुष नगरसेवकांसह महिला नगरसेवकांचाही समावेश होता.
दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सभागृहात एकमेकांवर बाटल्या, मतपेट्या फेकल्या. नवनिर्वाचित महापौर शेली ओबेरॉय म्हणाल्या की, भाजपच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या गुंडगिरीचा हा अंत आहे. महिला महापौरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सभागृहात गोंधळ सुरू होता. दोन्ही पक्षांचे नगरसेवक सभागृहातच झोपी गेले. गुरुवारी सकाळी न्याहारी झाल्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. गदारोळामुळे कामकाज पुन्हा तासभर तहकूब केले. बुधवारी दुपारी ते गुरुवारी सकाळपर्यंत सभागृहाचे कामकाज 6 वेळा तहकूब केले.
स्थायी समिती निवडणुकीदरम्यान काही सदस्यांनी मोबाईल आणले होते. त्यावर भाजप सदस्यांनी आक्षेप घेतल्याने गदारोळ सुरू झाला. महापौर शैली ओबेरॉय त्यांच्या अध्यक्षस्थांनी असताना भाजपचे सदस्य तिथे पोहोचले आणि मतपेटी उलटवली. यानंतर आप आणि भाजप सदस्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. सभागृहात सर्वत्र सदस्य एकमेकांशी वाद घालत होते. महिलांनीही एकमेकांवर हल्ला केला.
महापालिका निवडणुकीच्या 80 दिवसांनंतर दिल्लीला नवा महापौर मिळाला आहे. शेली ओबेरॉय यांना 150 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला. दिल्लीला 10 वर्षांनंतर महिला महापौर मिळाल्या आहेत. 2011 मध्ये भाजपच्या रजनी अब्बी शेवटच्या महिला महापौर होत्या. 2012 मध्ये शीला दीक्षित सरकारमध्ये दिल्ली महापालिकेची तीन भागात विभागणी केली. 2022 मध्ये हे भाग पुन्हा एकत्र आल्यानंतर एमसीडीची ही पहिलीच निवडणूक होती.
शेली ओबेरॉय यांना केवळ 38 दिवस महापौरपद भूषवता येणार आहे. डीएमसीच्या कलम दोन (67) नुसार, महापालिकेचे वर्ष एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते, जे पुढील वर्षाच्या 31 मार्चला संपेल. फेब्रुवारीचे पूर्ण 7 दिवस आणि मार्चचे 31 दिवस मिळून त्यांचा कार्यकाळ केवळ 38 दिवस उरला आहे. यानंतर 1 एप्रिलला पुन्हा महापौरपदाची निवडणूक होणार आहे. उपमहापौरपदी आपचे आले मोहम्मद इक्बाल यांची निवड झाली आहे. त्यांना 147 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या कमल बागडी यांचा पराभव केला.
COMMENTS