मुंबई । नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला मोठे खिंडार पडले आहे. पुण्यात एकाचवेळी ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय...
मुंबई । नगर सह्याद्री -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला मोठे खिंडार पडले आहे. पुण्यात एकाचवेळी ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र ठोकला आहे. एकाचवेळी ५० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
पुण्यातील कसबा निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, काही पदाधिकारी महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींना मिळाली आहे. यावर कठोर पाऊले उचलत पक्षश्रेष्ठीनी ७ कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आहे.
या हकालपट्टीनंतर काही पदाधिकारी नाराज झाले आहे. आणि याच नाराजीतून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता पुण्यातील याच ५० पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत कसब्यात रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याची उघड भूमिका घेतली आहे.
पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता मनसेला पडलेल्या भगदाडामुळे त्याचा भाजपलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याच्या बातम्या आल्यानंतर पुण्यातील मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
COMMENTS