कर्डिले-सातपुते गट समोरासमोर भिडले... अहमदनगर / नगर सह्याद्री - नगरमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकत्यांमध्ये तुफान र...
कर्डिले-सातपुते गट समोरासमोर भिडले...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
नगरमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकत्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. केडगाव मध्ये कर्डीले गट आणि सातपुते गट समोरासमोर एकमेकांना भिडले असून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. गाड्यांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दगडफेकीमुळे केडगाव मध्ये तणावाचे वातावरण आहे.
नगर तालुक्यातील एका गावात झालेल्या विवाह प्रसंगी भाजप नेते, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगर शहर प्रमुख, माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते यांच्यात खुन्नस वरून वाद झाला. त्यानंतर कर्डीले गटाच्या समर्थकांनी केडगावामध्ये येत हॉटेल रंगोली वर दगडफेक केली. त्यास सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिले. दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. दरम्यान रस्तारोको करण्यात आला. या दरम्यान पुन्हा दगडफेक झाली असून रस्त्याने जाणाऱ्या वाहणांचे नुकसान करण्यात आले आहे. दगडफेक झाल्यामुळे केडगाव मध्ये तणावाचे वातावरण असून पोलिसांचा फौंजफाटा केडगाव मध्ये तैनात झाला आहे.
रस्तारोको अन...
गेल्या काही वर्षांपासून केडगावमधील तणावाचे वातावरण कमी व्हायला तयार नाही. त्यात आज झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा केडगाव मधील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. याचे पडसाद केडगावमध्ये उमटले असून तब्बल दोन तास वाहतूक ठप्प होती. सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्तारोको केला.
मंगळवारी रात्री मेहकरी येथे एका विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यासाठी भाजपाचा युवा नेते अक्षय कर्डीले आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा युवा नेते ओंकार सातपुते हजर होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. या वादानंतर काही वेळातच केडगाव येथे सात ते आठ चारचाकी वाहनातून आलेल्या जमावाने येथील रंगोली हाॅटेलवर दगडफेक केली. या दगडफेकीत हाॅटेलमधील ग्राहक किरकोळ जखमी झाले.
दगडफेकीमुळे हाॅटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, नगर तालुका, एमआयडीसी, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत केडगावसह नगर शहरात तणावपूर्ण परिस्थिती होती. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
COMMENTS