अहमदनगर । नगर सह्याद्री नगर शहरात सध्या भारत गॅस कंपनीच्या पाईपलाईनसाठी रस्त्याची खोदाई सुरू आहे. सावेडी उपनगर परिसरातील चार प्रभागात खोद...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर शहरात सध्या भारत गॅस कंपनीच्या पाईपलाईनसाठी रस्त्याची खोदाई सुरू आहे. सावेडी उपनगर परिसरातील चार प्रभागात खोदाईनंतर आता आणखी चार प्रभागात सुमारे 52 किलोमीटर रस्त्यांची खोदाई व 105 किलोमीटर ड्रिलींग करण्यात येणार आहे. कंपनीने परवानगीसाठी मनपाकडे प्रस्ताव सादर केला असून, खोदाई शुल्कापोटी कंपनीला 136.74 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, 6.83 कोटी रुपयांची अनामत रक्कम बँक गॅरंटी स्वरूपात जमा करण्याच्याही सूचना आहेत.
भारत गॅस रिसोर्सेस कंपनीकडून नगर शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सावेडी उपनगर परिसरातील प्रभाग 1, 2 व 4, 5 या प्रभागात खोदाईचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता प्रभाग क्रमांक 6, 7, 8 व 9 या चार प्रभागात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईस परवानगी मागितली आहे. या चारही प्रभागात मिळून 52 किलोमीटर रस्त्याची खोदाई व 105 किलोमीटर ड्रिलींग करून गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. महापालिकेने या रस्त्यांच्या खोदाई शुल्कापोटी 136.74 कोटी रुपये जमा करण्याचे व 6.83 कोटी रुपयांची अनामत रक्कम बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.प्रभाग क्रमांक 6, 8 व 9 मध्ये 22 हजार 289 मीटर म्हणजेच सुमारे 22 किलोमीटर, तसेच 45 हजार 252 मीटर म्हणजेच सुमारे 45 किलोमीटर ड्रिलींग प्रस्तावित आहे. त्यापोटी 58.49 कोटी रुपये खोदाई शुल्क व 2.92 कोटी रुपये अनामत रक्कम कंपनीला भरावी लागणार आहे. बोल्हेगाव व नागापूर परिसरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये 29 हजार 818 मीटर म्हणजेच सुमारे 30 किलोमीटर खोदाई, तसेच 60 हजार 542 मीटर म्हणजेच सुमारे 60 किलोमीटर ड्रिलींग प्रस्तावित आहे. त्यापोटी 78.25 कोटी रुपये खोदाई शुल्क व 3.91 कोटी रुपये अनामत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीकडून याची पूर्तता झाल्यानंतर खोदाईस परवानगी दिली जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. दरम्यान रस्ता खोदाईमुळे संबंधित प्रभागातील बहुतांश रस्त्यांची कामे पुन्हा हाती घ्यावी लागणार आहेत.
पावसाळ्यात खोदाई थांबवावी
महापालिकेने सांगितलेली रक्कम कंपनीने जमा केल्यानंतर प्रत्यक्ष खोदाईस सुरूवात होईल. मात्र पावसाळ्यापूर्वी ती संपवावी किंवा त्या मुदतीत खोदाई न संपल्यास पावसाळ्यात खोदाई करण्यास मनाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पावसाळ्यात खोदाई केल्यानंतर नागरिकांना खड्डे, चिखल याचा भयंकर त्रास सहन करावा लागत असल्याने मनपाने ही काळजी घेण्याची मागणी होत आहे.
COMMENTS