नवी दिल्ली / वृत्तसंस्था- गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उझबेकिस्तानने (Uzbekistan) मॅरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले कफ सिरप प्यायल्याने...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था-
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उझबेकिस्तानने (Uzbekistan) मॅरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले कफ सिरप प्यायल्याने 19 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.
उझबेकिस्तानमध्ये (Uzbekistan) कथितरित्या भारतीय कफ सिरपच्या (Cough Syrup) सेवनानंतर 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) उझबेकिस्तानच्या अनेक वरिष्ठ अधिकार्यांच्या संपर्कात असून या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. नोएडास्थित कंपनी मॅरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले दोन कफ सिरपचा वापर करणं टाळावं, अशा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे.
उझबेकिस्तान (Uzbekistan) सरकारनं नोएडास्थित मॅरियन बायोटेकचं खोकल्यावरील सिरप 'डॉक-1 मॅक्स'ला मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. आतापर्यंत मॅरियन बायोटेकनं डब्ल्यूएचओला या उत्पादनांच्या सुरक्षिततेची आणि गुणवत्तेची हमी दिलेली नाही, असं सांगितलं जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी (11 जानेवारी) उझबेकिस्तानमधील मुलांसाठी दोन भारतीय कफ सिरप - एम्ब्रोनोल सिरप (Ambronol Syrup) आणि डॉक-1 मॅक्स सिरप - वापरू नयेत, अशी शिफारस केली आहे. मॅरियन बायोटेकद्वारे उत्पादित कफ सिरप ही गुणवत्ता मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने असल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. प्रयोगशाळेच्या विश्लेषणात दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकोल हे दोन्ही घातक पदार्थ आढळून आले आहेत.
उझबेकिस्तानचा दावा
उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं विश्लेषण करताना दावा केला आहे की, भारतीय कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आहे. असं म्हटलं जातं की, मुलांना प्रमाणापेक्षा या सिरपचा जास्त डोस देणं अत्यंत धोकादायक आहे. उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं होतं की, त्यांच्या देशातील मुलांनी नोएडास्थित मॅरियन बायोटेकचे 'डॉक-1 मॅक्स' कफ सिरपचं सेवन केलं होतं. त्यानंतर त्या मुलांचा मृत्यू झाला होता.
भारतातही विकले जातायत हे दोन्ही सिरप?
उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मृत्यू भारतीय कफ सिरपमुळेच झाल्याचा दावा वारंवार केला जात आहे. आता भारत सरकारनंही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या सूत्रांनी सांगितले होते की, हे सिरप सध्या भारतीय बाजारात विकलं जात नाहीये.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, यूपी ड्रग कंट्रोलर आणि सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) नं या प्रकरणी तपास सुरू केला आहे. सिरपचे नमुने चंदीगढला पाठवण्यात आले आहेत.
गाम्बियामध्ये भारतीय सिरपमुळे 60 मुलांचा मृत्यू
डॉक -1 मॅक्स सिरप (Doc-1 Max Syrup) मध्ये इथिलीन ग्लायकॉलची उपस्थिती असल्याचं दर्शविलं जात आहे. काही दिवसांपूर्वी याच घातक केमिकलमुळे गाम्बियामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला होता. 2022 मध्ये आफ्रिकन देश गाम्बियामध्ये 2022 मध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे 60 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. परंतु, भारतीय सिरपमुळेच गाम्बियामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाल्याची अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
COMMENTS