मुंबई । नगर सह्याद्री - माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो, माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील, आगामी काळात माझ्यावर काही संकट येऊ शकतात. मात्...
मुंबई । नगर सह्याद्री -
माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो, माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील, आगामी काळात माझ्यावर काही संकट येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. मला वाटतं की माणसं जागी झाली पाहिजेत, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यानी केला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष आहे. ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे या देखील शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर जहरी टीका करतात. त्यांच्या खोचक भाषणांमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. चंद्रपूर येथील सभेत त्यांनी स्वतःला असलेल्या धोक्याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेक गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे.
अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचे बोलले जाते. या नाराजीनंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली होती. त्यांच्या वक्तव्यांचा निषेध म्हणून आळंदीत प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली होती. भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
COMMENTS